बीड (रिपोर्टर) राज्यात सत्तांतर झाल्यानंतर बीड जिल्ह्याचे पालकत्व अतुल सावे यांच्याकडे देण्यात आले. मात्र पालकमंत्री नुसतेच कुंकवाचे धनी ठरू पाहत असून बीड जिल्ह्यात विविध प्रश्न शासन-प्रशासन व्यवस्थेच्या निर्णयामुळे तसेच आवासून उभे आहेत. शेतकर्यांना मदतीची घोषणा झाल्यानंतरही अद्याप पावेत शेतकर्यांच्या हाती नुकसानीची मदत मिळाली नाही तर दुसरीकडे विविध विकास कामांसह अन्य कामे रखडून पडले आहेत. आज पावेत पालकमंत्र्यांनी दोन ते तीन वेळा बीड जिल्ह्यात बैठका घेतल्या मात्र या बैठकांमध्ये केलेल्या घोषणा वांझोटे ठरल्याने शेतकर्यांच्या हाती काहीच लागले नाही.
सप्टेबर-ऑक्टोबरमध्ये संततधार पावसामुळे बीड जिल्ह्यात 5 लाख 86 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. नुकसान भरपाईपोटी 810 कोटी रुपयांची गरज असल्याचा अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत पाठवण्यात आला. शासनाने केवळ 410 कोटी रुपयांची घोषणा केली परंतु तीन ते चार महिने लोटून गेले तरी शेतकर्यांना केवळ माहिती भरण्याबाबत हेलपाटे मारावे लागत आहेत. शेतकर्यांच्या अन्य प्रश्नांकडेही व्यवस्था दुर्लक्ष करत आहे. पालकमंत्री अतुल सावे यांनी आतापर्यंत जिल्ह्यात दोन ते तीन वेळा बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये नुकसान भरपाई आणि पीक विम्याचा मुद्दा गाजला. त्यावेळी पालकमंत्र्यांनी आश्वासनही दिले परंतु ते आश्वासनही फोल ठरले. सावे हे बीड जिल्ह्यासाठी केवळ नावालाच मंत्री आहेत का, असा सवाल उपस्थित होत असून बीडचे पालकमंत्री केवळ कुंकवाचे धनी झाल्याने त्यांच्या हातून बीड जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लागतीलच हे सांगणे कठीण होऊन बसले आहे.