कॉपी रोखण्यासाठी शिक्षण विभागाचा निर्णय; परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू
बीड (रिपोर्टर) दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये होत आहेत. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाने ठोस पावले उचलली. सामूहिक कॉपी रोखण्यासाठी परीक्षा केंद्रावरील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर परीक्षा केंद्रावर नातेवाईक व पालकांनी गर्दी करू नये व कॉपीला समर्थन देऊ नये यासाठी केंद्राभोवती 144 कलम लागू करण्यात आला आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षामध्ये अनेक केंद्रांमध्ये कॉप्या चालतात. कॉपी कायमची बंद करण्यासाठी शिक्षण विभाग दरवर्षी ठोस निर्णय घेत असले तरी कॉपी मात्र बंद होताना दिसून येत नाही. काही ठिकाणी झेरॉक्सवर सामूहिकपणे कॉपीचे प्रकार यापुर्वी उघडकीस आलेले आहेत. यावर्षी केेंद्राजवळील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षा केेंद्राभोवती नातेवाईक आणि पालकांची गर्दी असते. काही नातेवाईक आपल्या पाल्यासाठी कुठला ना कुठला मार्ग काढून वर्गामध्ये कॉप्या पाठवत असतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्राच्या शंभर मिटर परिसरात कलम 144 लागू करण्यात आला आहे. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यासह पर्यवेक्षक, केंद्र संचालक व अन्य कोणालाही मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
संवेदनशील केंद्रांवर बैठे पथकाची नियुक्ती
दहावीच्या इंग्रजी, गणित आणि विज्ञान तर बारावीच्या इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, चिटणीसाची कार्यपद्धती, पुस्तपालन व लेखाकर्म, व्यापार संघटन आदी परीक्षांवेळी सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके धडक देणार आहेत. गरज भासल्यास शिक्षकेत्तर कर्मचार्यांची मदतही घेतली जाणार आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर बैठे पथकाची नियक्ती केली जाणार आहे.