बीड (रिपोर्टर): लग्नसोहळ्यात दागिने लंपास होण्याचे सत्र सुरूच आहे. बीडसह माजलगावातील घटना ताजी असतानाच 12 फेब्रुवारीला शहरातील शिंदेनगरजवळील कॅनॉल रोडवरील एका मंगल कार्यालयातून दागिने लंपास झाल्याचे समोर आले. वरमाई नातेवाइकांना बोलण्यात व्यस्त असल्याची संधी साधून चोरट्याने अडीच लाख रुपयांच्या दागिन्यांची बॅग पळवली. याबाबत 15 फेब्रुवारीला शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
माया भास्कर सोनवणे-चोपडे (रा. पिंपरगव्हाण रोड, बीड) या शिक्षिका आहेत. त्यांचा मुलगा स्वप्नील याचा 12 रोजी शहरातील कॅनॉल रोडवरील एका मंगल कार्यालयात विवाह पार पडला. माया सोनवणे या लग्नानंतर नातेवाइकांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी जवळील बॅग खुर्चीवर ठेवली. त्या नातेवाइकांना बोलण्यात व्यस्त असल्याची संधी साधून चोरट्याने नेकलेस, मिनी गंठण, पँडल असे दागिने व रोख 10 हजार रुपये, एक मोबाइल असलेली बॅग लंपास केली. एकूण 2 लाख 54 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग लंपास केल्याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर तपास करीत आहेत.