भाजपाचे उमेदवार हेमंत रासनेंचा 11 हजार मतांनी पराभव; चिंचवडमपध्ये आघाडीच्या फुटीचा भाजपाला फायदा; भाजपाच्या अश्विनी जगतापांची 67 हजार 556 मते घेऊन विजयी घोडदौड
पुणे (रिपोर्टर) अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुण्यातील कसबा व चिंचवड विधानसभा पोट-निवडणुकीसाठी परवा झालेल्या मतदानाची आज मतमोजणी झाली असता गेल्या 28 वर्षांपासून ज्या कसब्यावर भाजपाचा ताबा होता तो कसबा महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या रविंद्र धंगेकरांनी घासून नव्हे तर ठासून ताब्यात घेतला. कसब्यावरील रविंद्र धंगेकरांचा हा विजय भाजपाला आत्मचिंतन करावयास लावणारा आहे तर तिकडे चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप यांना प्रचंड सहानुभूती मिळाल्याने त्या 18 व्या फेरीअखेर तब्बल 11 हजार मतांनी आघाडीवर होत्या. या ठिकाणी आघाडीचे उमेदवार नाना काटे हे पिछाडीव होते. अपक्ष असलेल्या राहूर कलाटेंनाही येथे चांगले मते मिळाली.
राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारने अत्यंत प्रतिष्ठेची केलेली पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत आज आघाडीसह शिंदे-फडणवीस सरकारला एक-एक आमदार मिळाला. ज्या कसब्यावर गेल्या 28 वर्षांपासून भाजपाचा ताबा होता. गिरीष बापटांसारखा भाजपाचा नेता या कसब्यावर दबदबा निर्माण करून सोडणारा होता. परंतु गेल्या काही वर्षांपासून भाजपाने महाराष्ट्रात अत्यंत गलिच्छ राजकारण सुरू केल्याचे दिसून येते. निकाला दरम्यान उपस्थित कसबेकरांनी दिलेल्या प्रतिक्रिया या भाजपाा आत्मचिंतीत करायला लावणार्या आहेत. कसबा पोटनिवडणुकीत भाजपाकडून हेमंत रासने तर आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे निवडणूक रिंगणात होते. शिंदे-फडणवीस सरकारने अवघडे मंत्रिमंडळ या मतदारसंघामध्ये प्रचारासाठी उतरवले होते. भाजपाचा दबदबा असलेल्या कसब्यावर मात्र आज निकालात काँग्रेसचा कब्जा झाल्याचे दिसून आले. रविंद्र धंगेकर हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांना या निवडणूकीत 61 हजार 771 तर रविंद्र धंगेकर यांना 72 हजार 599 मते मिळाली. त्यामुळे धंगेकरांचा या निवडणुकीत दहा हजार 828 मतांनी दणदणीत विजय झाला. तिकडे चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपाच्या अश्विनी जगताप यांना चांगलीच सहानुभूती मिळाल्याचे चित्र निकालातून दिसून आले आहे. या ठिकाणी भाजपाकडून अश्विनी जगताप, आघाडीकडून नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. आज निकालात पहिल्या फेरीपासून भाजपाच्या अश्विनी जगताप या आघाडीवर पहायला मिळाले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा अश्विनी जगताप यांना 19 व्या फेरीअखेर 67 हजार 556, आघाडीचे नाना काटे 55 हजार 848, अपक्ष राहुल कलाटे 22 हजार 317 मते घेऊन होते. या निवडणुकीत अश्विनी जगताप यांचा विजय निश्चित मानला जातो. आघाडीमध्ये बिघाडी झाल्यामुळे आणि राहुल कलाटेंनी आपली उमेदवारी टाकल्यामुळे या ठिकाणी अश्विनी जगतापांचा विजय सुकर झाल्याचे पहावयास मिळत आहे. आघाडीचे आणि अपक्ष उमेदवारांचे एकूण मते पाहता या ठिकाणीही भाजपाला काही प्रमाणात जनतेने नाकारल्याचे दिसते. केवळ सहानुभूतीच्या जोरावर आणि आघाडीतील फुटीच्या राजकारणामुळे अश्विनी जगताप या ठिकाणी 11 हजार 704 आघाडीचे मताधिक्य घेऊन विजयी मार्गावर आहेत.