गणेश सावंत
मो. नं. 9422742810
देशात आणि राज्यात धर्मांधतेचा वळू ज्या पद्धतीने उधळत आहे त्या वळूचे वर केलेले शेपूट पिरगाळणे आता महत्वाचे होऊन बसले आहे. शेतकरी आत्महत्या करतोय, शेतकर्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही, त्याला उदरनिर्वाह करणं मुश्किल होवून बसलं आहे. लेकरांना शिकवणं तर सोडाच त्या लेकरांच्या तोंडात दोन घास सुखाचे घालणे शेतकर्यांसाठी तारेवरची कसरत होऊन बसली आहे अन् अशा स्थितीत केंद्रातलं सरकार जातीय द्वेष आणि धार्मिक तेढाला अधिक महत्व देतय. केंद्र सरकारचे ध्येय-धोरण हे कष्टकरी शेतकर्यांच्या बाजुने असायला हवे, मात्र मंदिर-मस्जिद आणि शहरांचे नामांतरण यावर सर्वसामान्यांना गुंतवून ठेवणार्या मोदी सरकारकडून शेतकर्यांनी सुगीच्या दिवसाची आशा ठेवणे म्हणजे गाढवा पुढे गिता वाचण्यासारखे म्हणावे लागेल. आज जो हा संताप येतोय तो केवळ आणि केवळ कोण-कुणच्या जातीचा, कुणाचा धर्म कुठला यावर सरकार थेट भाष्य करतय. जो शेतकरी घामाचा रक्त ओकतोय त्या शेतकर्याला जातीपेक्षा, धर्मापेक्षा आपल्या पोटाचं आणि कर्तव्य-कर्माचं अधिक महत्व असतं. परंतु याच शेतकर्याला तुझी जात कोणती? हे विचारून रासायनिक खते मोफत नव्हे तर चढ्या भावाने देण्याचं धोरण केंद्र सरकारचं जेव्हा समोर येतं तेव्हा सर्वास पोटास लावणे आहे चा नारा देणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र ही जातीय विषवल्ली बहुजनांच्या महाराष्ट्रात उगू देणार नाही. परंतु ज्या पद्धतीने केंद्र सरकार धर्माचं आणि जातीचं ध्रुवीकरण करत सर्वसामान्यांच्या मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष करतं, त्याविरुद्ध आता स्पष्टपणे व्यक्त व्हायला हवे. शेतकर्यांना जात विचारून केंद्र सरकारला नेमकं करायचं काय? शेतकर्यांची जात आणि
धर्म हा शेतकरीच
बहुदा राज्यकर्ते मोदींना आणि त्यांच्या बगलबच्च्यांना शेतकर्यांचा धर्म आणि जात माहित नसावी. शेतकर्यांची जात आणि धर्म हा कर्तव्य कर्म आहे. साडेतीनशे चारशे वर्षांपुर्वी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी शेतकर्यांच्या जातीवर आणि धर्मावर भाष्य करताना तो आपल्या कर्तव्य कर्माशी किती इमानदार असतो हे सांगताना थेट म्हटले आहे,
मढे झाकुनिया करिती पेरणी ! कुणबियाची वाही लवलाहे!!
तयापरी करा स्वहित आपुले ! जयासी फावले नरदेह !!
जेव्हा जून महिना उजडतो, पहिला पाऊस पडतो, पेरणीची लगबग सुरू झालेली असते त्यावेळी शेतकर्याच्या घरात एखादा व्यक्ती मयत होतो तेव्हा शेतकरी ते मढं झाकून ठेवतो आणि आधी पेरणीला महत्व देतो. शेतकर्यांवर भाष्य करताना, शेतकर्यांची जात विचारताना, त्याचा धर्म पुसतांना राज्यकर्त्यांनी त्यांच्या कर्तव्य-कर्माकडे लक्ष दिलं असतं तर भलं झालं असतं. शेतकरी नुसता पेरता होत नाही, आपल्या रक्ताचा घाम त्या बिजांच्या मुळाशी घालतो आणि तजेलदार पिक आणून अखंड विश्वासाठी सुगीचे दिवस आणतो. एवढेच नाही तर
धर्म आहे ज्या कुळाचा दो करांनी देत जावे।
शिवाराची होत सुगी पाखरांना तोषवावे॥
असं म्हणत आपला खरा धर्म जगासमोर मांडताना दोन्ही हाताने वाटता कसे येईल आणि शिवारात कणसं फुलली तर ते पाखरांनाही कसे पोसता येईल याकडे लक्ष देतो. शेतकरी तो कुठल्या जातीचा आहे, तु कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पंथाचा आहे हे पाहण्यापेक्षा शेतकरी ज्या पद्धतीने धर्म आहे ज्या कुळाचा दो करांनी देत जावे, म्हणत मुक्तहस्ते उधळण करतो, त्या उधळणीतल्या दोन टक्क्यात केेंद्र आणि राज्य सरकारने शेतकर्यांकडे लक्ष द्यायला हवे. शेतकर्यांचा धर्म आणि जात विचारणार्या मोदी सरकारने शेतकर्यांच्या शेतातील पिकांना भाव मिळतो का?हे खत घेताना विचारलं असतं तर ते अधिक महत्वाचं ठरलं असतं. राजकारणातलं सत्ताकारण करताना
डोक्याचं गहाणखत
करणार्या मोदी सरकारच्या मंत्र्यांची अन् त्यांच्या पिलावळांची खरच आता किव करावीशी वाटते. 2013 साली खताचे असणारे भाव आणि 2023 साली रासायनिक खतांचे भाव पाहितले तर मोदी सरकारने शेतकर्यांच्या माथी किती अवहेलना दिल्या ते लक्षात येईल. 2013 चे शेतीमाल भाव आणि 2023 चे शेतीमाल भावासह शेतातली मजुरी पाहितली तर शेतकरी आजही आतबट्याचा व्यवहार करतो मात्र अशा वेळी तो कुठल्या जातीचा अथवा धर्माचा म्हणून त्या आतबट्ट्याच्या व्यवहाराकडे पाहत नाही तर ते कर्तव्य-कर्म आहे असे समजूनच पेरता होतो. परंतु जातीयवादाच्या आणि धर्मांधतेच्या डोक्यामध्ये जेव्हा अळ्या वळवळ करतात, व्यवस्था जेव्हा त्या अळ्यांची साठवणूक करून आपल्या सडक्या मेंदूतून थेट शेतकर्यांच्या जातीवर आणि धर्मावर बोट ठेवते तेव्हा मात्र संतापाचा कडेलोट होतो आणि या कडेलोटातून मऊ मेनाहून आम्ही विष्णूदास
कठीण वज्रास भेदू
भले तरी देवो कासेची लंगोटी !
नाथाळाच्या माथी हाणू काठी !!
म्हणत शेतकरी व्यवस्थेला आव्हान देईल. तेव्हा व्यवस्थेची पळताभुई थोडी होईल. आम्हाला आश्चर्य याचं वाटतं, एकीकडे कांद्याला भाव नाही शेतकर्याचा कापूस घरामध्ये भावाविना पडून आहे, सोयाबीनची अवस्था भिकारचोट होऊन बसली आहे आणि अशा स्थितीत शेतकर्यांना सावरण्यापेक्षा शेतकर्यांना जात आणि धर्म विचारून मोदी सरकार ज्या पद्धतीने जाती-पातीचे उच्चाटन करण्यापेक्षा धर्मांधतेला प्रोत्साहन देते अशा वेळी जो शेतकरी काळ्या आईच्या उदरातून कणिस पिकवू शकतो, काळ्या आईची छाती फाडून आपल्या घामाने आणि अश्रूंच्या पाण्याने पिक उभारू शकतो तो शेतकरी जेव्हा हातात रुमणं घेईल, आज जरी तो मेनाहून मऊ दिसत असला तरी त्याच्या शक्तीची, त्याच्या सहनशिलतेचा अंत जेव्हा संपुष्टात येईल त्या वेळेस तो व्यवस्थेच्या मस्तकात काठ्या घातल्याशिवाय राहणार नाही. राजकारण आणि सत्ताकारण करताना रयत सुखी झाली पाहिजे, प्रजेचं राज्य आहे आणि त्या जनतेच्या राज्यात शेतकरी सुखावलेला आहे या भूमिकेत राज्यकर्त्यांनी काम करायला हवे, मात्र असे काम न करता जेव्हा राज्यकर्तेच जातीचे आणि धर्माचे भांडवल आपल्या सत्ताकारणाच्या गणितात जुळवतात तेव्हा अशा राज्यकर्त्यांना जातीची शिंदळ तिला कोण कैसे वळी, आप घर ना बापघर । चिंती मनीं व्याभिचार!! असेच म्हणावे लागेल. एखादी शिंदळ बाई असते तिला व्याभिचार करू नको म्हणून कितीही सांगितलं तरी ती बापाच्या घरी असो अथवा नवर्याच्या घरी असो किवा नवर्याच्याच शेजेवर झोपलेली असो तिच्या मनी जसा परपुरुषाचा विचार असतो तसाच राज्यकर्ते भाजपाच्या मनी शेतकरी मरो अथवा जगो सत्ताकारणाचे गणित कायम असते. असेच हे
तट्टाच्या जातीचे
राज्यकर्ते तर नव्हे! असा संशय आता यांच्या शेतकर्यांबाबतच्या धोरणावरून दिसून येतो. तुकोबांचे बंधू यांनी आपल्या एका अभंगात अशा लोकांबाबत म्हटले आहे……
तट्टाचे जातीला नाहीं भीड भार । लाता मारी थोर लहान नेणे ॥1॥
परी तो त्या विशेष मनुष्य होऊन । करी खंड मान वडिलांचा ॥ध्रु.॥
बेरसा गाढव माय ना बहीण । भुंके चवीविण भलतें चि ॥2॥
तुकयाबंधु म्हणे बोकड मातलें । न विचारी आपुले तोंडीं मुते ॥3॥
या अभंगाचा अर्थ ‘तट्टाच्या जातीला भीड नसते त्यामुळे तो कोणालाही वाटेल त्याला लाथ मारतो कारण लहान-थोर हे त्याला काहीच समजत नाही .परंतु विशेष असे की मनुष्य जन्म जरी मिळाला तरी काही मनुष्यांना ज्येष्ठ-श्रेष्ठ समजत नाही आणि समजत नसेल तर तो त्यांची मानखंडना करत असतो आणि असे असेल तर तो त्या तट्टा पेक्षाही नीच जातीचा आहे असे समजावे .जर एखादा मनुष्य आपल्या आईला व बहिणीला वाटेल तसे बोलून भुंकत असेल तर तो मनुष्य नाही तो गाढवच आहे असे समजावे. तुकया बंधू कान्होबा म्हणतात की बोकड माजले तर कोणताही विचार न करता स्वतःच्या तोंडात मुततो.’ अशा व्यवस्थेला हीच भाषा समजते. आज आम्ही ही भाषा केवळ जातीयवाद आणि धर्मांधतेच्या विषवल्लीत जगणार्यांबाबत वापरली आणि तेव्हाही संत नामदेव असतील, संत तुकाराम असतील यांनी जातीयवाद आणि धर्मांधतेच्या व्यासात राहणार्या लोकांबाबत वापरलेली आहे. शेतकर्यांना जात विचारत असाल तर त्या शेतकर्यांची जात फक्त ‘शेतकरी’ आणि शेतकरी एवढीच आहे. त्याची जात, त्याचा धर्म विचारण्यापेक्षा त्याच्या कर्तव्य कर्माला महत्व देत राज्यकर्त्यांनी शेतीमालाला भाव दिला तर ते अधिक बरं होईल.