बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध पद्धतीने गुटखा विक्री केला जात असल्याचे सातत्याने समोर येत असताना रात्री गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तालुक्यातील घोडका राजुरी परिसरात एका पत्र्याच्या गोडाऊनमध्ये छापा मारून सुमारे 52 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. यामध्ये एक स्कॉर्पिओ ताब्यात घेण्यात आली असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून दुसरा फरार असल्याचे सांगण्यात येते. जप्त केलेला गुटखा व आरोपी हा पिंपळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, बीडसह आष्टी, पाटोदा, शिरूर, परळी, अंबाजोगाई, गेवराई, माजलगाव, धारूर, वडवणी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैधरित्या विक्री होते. हे सर्वश्रूत असतानाच बीड तालुक्यातील घोडका राजुरी परिसरातील एका पत्र्याच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला झाली. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, उपनिरीक्षक भगतसिंह दुल्लत, पो. कॉ. मुन्ना वाघ, प्रसाद कदम, सोमनाथ गायकवाड, सचीन आंधळे, विकास वाघमारे, नारायण कोरडे, चालक अतुल हराळे, अशोक कदम यांनी सदरच्या गोडाऊनवर छापा मारला असता त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुटखा आढळून आला. तब्बल 52 लाखांच्या आसपास हा गुटखा असून एका स्कॉर्पिओसह तो गुटखा पोलिसांनी जप्त केला. या वेली घटनास्थळावरून महारुद्र मुळे यास ताब्यात घेण्यात आले आहे तर अन्य एक फरार झाला आहे. जप्त करण्यात आलेला गुटखा पिंथपळनेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला असून या कारवाईने गुटखा माफियांमध्ये खळबळ माजली आहे.