नेकनूर (रिपोर्टर) सत्तर वर्षीय वृद्धाच्या डोक्यात दगड टाकून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुळुकवाडीपासून काही अंतरावर असलेल्या कवडेवाडी येथे आज सकाळी उघडकीस आली. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव गोरख सीताराम ढास (वय 70) असे असून आज पहाटे जेव्हा त्यांच्या पत्नीला गोरख ढास हे घरात दिसून आले नाही तेव्हा त्यांनी घराबाहेर पाहिले असता घराच्या पाठीमागील बाजूस त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी घटनास्थळाला भेट दिली.
याबाबत अधिक असे की, नेकनूरपासून काही अंतरावर असलेल्या मुळुकवाडी येथील काही लोक कवडे वस्ती या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून राहतात. या वस्तीवर गोरख सीताराम ढास (वय 70) व त्यांच्या पत्नी राहतात. रात्री या वृद्ध दाम्पत्याने जेवण केले, आणि वस्तीवरील घरात झोपले. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ढास यांच्या पत्नला जाग आली, तेव्हा ढास घरात दिसून आले नाही. त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या पत्नी घराबाहेर पडल्या असता घराच्या पाठीमागील बाजूस ढास यांचा मृतदेह आढळून आला. अज्ञात मारेकर्यांनी गोरख ढास यांच्या डोक्यात मोठा दगड टाकून निर्घृणपणे खून केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सत्तर वर्षीय वृद्धाची एवढ्या निर्घृणपणे हत्या कोणी व का केली? हे अद्याप समजू शकले नसले तरी घटनास्थळावर एक मेलेली कोंबडी, कोंबडीचे अंडे आढळून आले आहेत. सदरची हत्या ही अघोरी जादूटोण्यातून झाली आहे का? असा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना झाल्यानंतर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख, उपनिरीक्षक विलास जाधव, पो.कॉ. प्रशांत क्षीरसागर, अनिल राऊत, सचिन डिढूळ, नागरगोजे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी घटनास्थळाला भेट दिली असून गोरख ढास यांच्या मारेकर्यांचा शोध पोलीस घेत आहेत.