स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
बीड (रिपोर्टर) आष्टी बसस्थानकात बसची वाट पहात बसलेल्या एका महिलेच्या गळ्यातील तब्बल 68 ग्रॅमचे गंठण बळजबरीने पोबारा केल्याची घटना भरदिवसा घडली होती. या घटनेने खळबळ उडाल्यानंतर याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने करत अवघ्या आठ दिवसात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना मुद्देमालासह जेरबंद केले.
विजया विश्वनाथ शिंदे (वय 69, रा. प्राध्यापक कॉलनी मुर्शदपूर ता. आष्टी) गावी जाण्यासाठी आष्टी बसस्थानकात 18 मे रोजी दुपारी तीन वाजता आल्या होत्या. बसची वाट पहात असताना दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 68 ग्रॅमचे गंठण हिसकावले. भरदिवसा गर्दीत ही घटना घडल्याने खळबळ उडाली होती. अनेक बसस्थानकात चोर्यांचे प्रमाण वाढलेले आहे. आष्टीच्या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा मार्ग काढत गणेश दिनकर झिंजुर्डे व किशोर भाऊसाहेब शेळके (रा. पाथर्डी) यांनी हा गुन्हा केल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोल्हापूर, कराड, सातारा, कल्याण, अहमदनगर ते पुणे कल्याण, माळसेज असा प्रवास करत चोरट्यांच्या मुसक्या बांधल्या. सदरील कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचीन पांडकर, स्था.गु.शा.चे पो.नि. सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत, पो.ह. मनोज वाघ, प्रसाद कदम, सोमनाथ गायकवाड, विकास वाघमारे, सचीन आंधळे, अलिम शेख, विक्की सुरवसे, अशोक कदम यांनी केली.