विभागाचा निकाल 94.97 टक्के; यंदाही सुकन्यांचा दबदबा
बीड (रिपोर्टर) राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. ‘ऑनलाइन’ स्वरुपात जाहीर केलेल्या निकालात औरंगाबाद विभागीय मंडळातून औरंगाबाद जिल्ह्याने बाजी मारली. या जिल्ह्याचा निकाल 96.48 टक्के लागला. बीड जिल्हा दुसर्या, तर जालना जिल्हा तिसर्या क्रमांकावर राहिला. हिंगोली आणि परभणी हे जिल्हे मात्र पिछाडीवर राहिले.
औरंगाबाद विभागात या वर्षी कॉपीमुक्ती अभियानाची कडक अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे निकाल घसरणार अशी अपेक्षा होती. मात्र, निकाल यापेक्षा उलट लागला. औरंगाबाद विभागाचा निकाल 94.97 टक्के लागला. गेल्यावर्षीपेक्षा औरंगाबाद विभागाचा निकाल 4.37 टक्क्यांनी घसरला असल्याची माहिती औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाचे प्रभारी अध्यक्ष अनिल साबळे यांनी दिली. औरंगाबाद विभागातून 1 लाख 64 हजार 263 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यापैकी 1 लाख 56 हजार 015 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलींनी बाजी मारली असून त्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 95. 75 टक्के आहे. बारावी निकालानंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या वाटा मोकळ्या होतात. त्यामुळे निकाल जाणून घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांत सकाळपासूनच उत्सुकता होती. विद्यार्थ्यांनी निकाल जाणून घेण्यासाठी इंटरनेट कॅफेंवर गर्दी केली होती. अनेकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. महाविद्यालयांत गटागटाने जाऊन अनेकांनी निकाल बघून जल्लोष केला.