होय आज रिपोर्टर 30 वर्षांचा झाला. या तीन दशकाच्या कालखंडात किती संघर्ष करावा लागला, किती यातना भोगाव्या लागल्या. यापेक्षा या तीन दशकामध्ये रिपोर्टर किती दिनदुबळ्यांचा आवाज बनला. हे अधिक महत्वाचे.
चलता रहूँगा पथ पर,
चलने में माहिर बन जाऊँगा,
या तो मंजिल मिल जायेगी या
अच्छा मुसाफ़िर बन जाऊँगा
असे मनात घेऊन आम्ही पुढे चालत गेलोत आणि हा हा म्हणता, एक कारवाँ बनला. ज्या सत्य आणि अहिंसेच्या पथावर आम्ही निघालो, त्याची मंजिल मिळाली की नाही, याला महत्व नाही. परंतु या काटेरी पथावर चालताना वाचक मायबापांच्या बळावर एक चांगला मुसाफीर नक्कीच झालो. यात आम्हाला सार्थ अभिमान आहे. दैनिक चालवताना किती कष्ट पडते, किती अडचणी येतात हे सांगणे आज तरी आम्हाला महत्वाचे वाटत नाही, कारण ते कष्ट आणि अडचणी आमच्या खांद्यावर वाचक मायबाप अलगदपणे त्यांच्या प्रेमातून स्वत:च्या खांद्यावर घेत आले. म्हणूनच 30 वर्षे सत्य-न्यायची बाजू आम्हाला घेता आली. बीड जिल्हा हा कष्टकर्यांचा जिल्हा आहे, ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. इथले लोक अत्यंत संवेदनशील आहेत, प्रेमळ आहेत. इथले प्रश्न तेवढेच जटील आहेत. या सर्व प्रश्नांचे उत्तर शोधताना आम्ही साध्य ते असाध्य या भूमिकेत लिहित आलो आहोत.
बीडची पत्रकारीता
ही अनन्यासाधारण आहे. तिच्यामध्ये अधिक आक्रमकता आहे आणि ती आक्रमकता इथल्या जटील प्रश्नांनी पत्रकारितेत आली आहे. रिपोर्टर सातत्याने कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांच्या पाठिशी उभा राहिला आहे. त्यांचा आवाज बनला आहे. आंदोलन कुठलेही असो, ते कुठल्याही समाजाचे असो, त्याला प्रथमदर्शी प्रसिद्धी देत त्यांचे प्रश्न सरकारपर्यंत मांडणे हेच धोरण रिपोर्टरने मांडले आहे. सकारात्मक पत्रकारितेला अधिक महत्व दिले आहे. ‘आम्हा घरी धन शब्दाची रत्ने, शब्दाची शस्त्रे यत्न करू’ हे अभिवचन आत्मसात करून चांगले कार्य करणार्यांच्या गळ्यामध्ये शब्दांचे रत्नडीत हार रिपोर्टरने घातले. जो पाखंडी आहे, भ्रष्टाचारी आहे, दुराचारी आहे, अशांसाठी रिपोर्टरने शब्दांची शस्त्रे केली आणि त्या शब्दांच्या वारात अनेक जण घायाळही झाले. भलेही ते नाराज झाले असतील परंतु त्यांच्यातली दुराचारी भावना नष्ट करणे, हा रिपोर्टरचा हेतू कायम राहिला आहे. इथले राजकारण असो, समाजकारण असो, अर्थकारण असो त्यावर सातत्याने रिपोर्टरने भाष्य केले. दर्जेदार लिखानातून वाचकांची वाचनाची भूख रिपोर्टरने भागविली. हे सर्व करत असताना खरचं आम्ही 30 वर्षांचे झालोत का? हा प्रश्न जेव्हा आम्हाला पडतो तेव्हा आमच्या डोळ्यासमोरून तो तीस वर्षांचा कालखंड अक्षरश: विद्युत गतीने डोळ्यासमोरून जातो आणि आम्हाला समाधानही लाभते. एक छोटीशी टेकडी असलेला रिपोर्टर आज 30 वर्षांच्या निधड्या छातीचा सह्याद्री झाला. आता कसेही वादळ येवोत, कितीही संकटे येवोत रिपोर्टर सत्याची कास, न्यायाची भूमिका कायम घेत सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाीं त्याचा आवाज बनूनच राहिल. भलेही
आम्हाला कोणी गुंड म्हटले
तरी चालेल. ‘आम्ही झालो गावगुंड, अवघ्या पुंड भुतांशी’ जगद्गुरू तुकोबा म्हणतात, अनाचारी, लुटारू, दुराचारी लोकांसोबत आम्ही जशास तसे लढू. त्यावेळी आम्हाला कोणी गुंड म्हटलं तरी चालेल. आम्हीही त्याच भूमिकेत आहोत. इथल्या सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसासाठी कोणी गुंडगिरीच्या स्वरुपात अनाचारी, दुराचाराच्या रुपामध्ये काम करत असेल तर अशांना प्रखर विरोध करणे हे आमचे ध्येय-धोरण असेल. बीड जिल्ह्याचे प्रश्न हे जेवढे जटील आहेत त्या जटील प्रश्नांवर उत्तर शोधणे हेही आमचे धोरण राहिल. सिंचनाचे क्षेत्र वाढवणे आणि इथल्या राजकारणामध्ये समाजकारण आणणं, हे आमचं यापुढचं ध्येय असेल. राजकारणी राजकारण करतात. निवडणुकीपुरते ते लोकांसोबत असतात, मात्र एकदा निवडणुका झाल्या की पुन्हा ते दिसत नाहीत. अशा वेळी त्या त्या मतदारसंघातल्या लोकप्रतिनिधींना त्यांच्या कर्तव्यकर्माची आठवण देणे आणि स्थानिक गावगावचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडणे ही यापुढची रिपोर्टरची रुपरेषा असेल. आजपर्यंत रिपोर्टरच्या चांगल्या-वाईट दिवसामध्ये वाचकांनी खंबीरतेने साथ दिली. आताही वाचक मायबाप आमच्या सोबत असतीलच.