पोलिसांच्या मारहाणीत संशयित आरोपीचा मृत्यू?
दोषी पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक करा
जोपर्यंत गुन्हा अणि अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही
घटनास्थळावर एसपींसह वरिष्ठ पोलीस अधिकारी तळ ठोकून
शहरात तणावपुर्ण शांतता,
पोलीस बंदोबस्तात वाढ
परळी (रिपोर्टर): चोरीच्या प्रकरणात संशयित म्हणून परळी शहर पोलिसांनी पिता-पुत्राला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यातील पित्याचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. पोलीस ठाण्यात पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू पावलेल्या संशयिताच्या नातेवाईकांना घटनेची माहिती होताच त्यांनी तात्काळ शहर पोलीस गाठले. शेकडोंच्या संख्येने पोलीस ठाण्यावर जमा जमा झाला. या प्रकरणातील दोषी पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसमोर हट्ट धरला. सध्या परळीत जिल्हा पोलीस अधिक्षकांसह सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकारी तळ ठोकून असून शहरात तणावाचे वातावरण आहे. जमावाला शांत करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रयत्नांची परिकाष्ठा करत असले तरी संबंधित दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करा, या मागणीवर अडून बसले आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर या मागणीबाबत विचार केला जाईल, असे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी म्हटले आहे.
या खळबळजनक आणि धक्कादायक घटनेची माहिती अशी की, परळी शहरातील मलिकपूर भागातील एका चोरीच्या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून जरीन खान (वय 48) व त्याच्या मुलाला परळी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान जरीन खान यांचा पोलीस ठाण्यात मृत्यू झाला. पोलिसांनी रात्रीच त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषीत केल्यानंतर या घटनेची माहिती वार्यासारखी शहरभर पसरल आणि खळबळ उडाली. मयत जरीन खान यांच्या सोबत ताब्यात घेतलेल्या त्यांच्या मुलाने पोलिसांच्या मारहाणीमुळेच आपल्या पित्याचा मृत्यू झाला, असा आरोप केला. पोलिसांनी आपल्या बापाची हत्या केल्याचेही संतप्त होऊन त्याने म्हटले. त्यामुळे रात्रीच जरीन खान यांच्या नातेवाईकांसह शेकडोचा जमाव पोलीस ठाण्यावर आला. या प्रकरणातील दोषी पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना झाल्यानंतर आणि शहरात तणावाची स्थिती निर्माण झाल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी रात्रीच घटनास्थळ गाठले. परळीत ते तळ ठोकून आहेत. पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. सदरची घटना ही अत्यंत धक्कादायक आणि पोलिसांच्या मारहाणीमुळे हुकुमशाहीमुळे झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. जमावाला शांत करण्यासाठी आणि शहरातील तणाव कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनातले अधिकारी प्रयत्नांची परिकाष्ठा करीत आहेत. घटनेचे गांभीर्य पाहून शवविच्छेदनासाठी जरीन खान यांचा मृतदेह अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे. रात्री मोठ्या प्रमाणावर जमाव जमल्यानंतर आज सकाळी नातेवाईकांसह लोकांनी मोठ्या प्रमाणावर पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली. दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करत त्यांना तात्काळ अटक करा, म्हणत नातेवाईक आक्रमक असून जोपयंत खुनाचा गुन्हा दाखल होऊन दोषींना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशा भूमिकेत नातेवाईक असल्याने शहरात तणावाचे वातावरण आहे.
परळी ठाण्यातली दुसरी घटना
गेल्या काही वर्षांपूर्वी परळी पोलिस ठाण्याच्या कोठडीत आरोपीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी तत्कालीन पीआय उमेश कस्तुरे हे न्यायालयीन कोठडीत आहेत. रात्री पुन्हा परळी शहर ठाण्यात संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतलेल्या 48 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाल्याचे सांगण्यात येऊ लागल्याने हे प्रकरणही पोलिसांवर चांगलेच शेकणार आहे.