शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांचा लाचखोरीचा धंदा
संतापजनक : कुटुंब शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांनी घेतले पैसे; केवळ पाचशे रुपयांसाठी महिलेला काढले
ऑपरेशन थिएटरबाहेर; ऑपरेशन केलेल्या महिलेला जमीनीवर झोपवले; पाण्याची व्यवस्था नाही
लाचखोर डॉक्टरासह दोषींवर कठोर कारवाईची मागणी
शिरूर कासार (सतीश मुरकुटे): कुटुंब नियोजनाच्या प्रचारासाठी राज्य शासन कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. कुटुंब नियोजन करणार्या महिलांना प्रोत्साहनपर काही रकमेची मदतही करते, मात्र शिरूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंबनियोजन करण्यासाठी आलेल्या महिलांना व त्यांच्या नातेवाईकांना सर्रासपणे लुबाडल्याचे नव्हे नव्हे तर लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ऑपरेशन केलेल्या महिलांकडून एक हजारपासून साडेतीन हजार रुपयांपर्यंत रक्कम डॉक्टरांनी घेतल्याचे रुग्णांनी सांगितले. एवढेच नव्हे तर एका महिलेकडे केवळ दोनशे रुपये नव्हते, म्हणून तिला ऑपरेशन थिएटरबाहेर काढल्याचा संतापजनक प्रकारही याच ठिकघाणी घडला असून ऑपरेशन केलेल्या सर्व महिलांना एका पोर्चमध्ये खाली जमीनीवर झोपवण्यात आले. एवढे मोठे शिबीर होत असताना साधी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था त्याठिकाणी दिसून आली नाही. येथील आरोग्य विभागाच्या या गलथान कारभाराचा पर्दाफाश सायं. दैनिक बीड रिपोर्टरने केला असून पैसे घेतलेल्या डॉक्टरांसह व्यवस्थापनात असफल असलेल्या सर्वच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.
या संतापजनक आणि डॉक्टरांच्या लाचखोरीबाबतची अधिक माहिती अशी की, शिरूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आज कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी 26 महिला आल्या होत्या. रात्री त्यांना उपाशी पोटी ठेवून आज त्यांच्यावर ऑपरेशन होणार होते. जेव्हा प्रत्यक्ष ऑपरेशनला सुरुवात करण्यात येऊ लागली तेव्हा कुटुंबनियोजन करण्यासाठी आलेल्या महिलांकडून एक हजार रुपयांपासून साडेतीन हजार रुपयांपर्यंत घेण्यात आले. रिपोर्टरने रुग्णालयात जावून या घटनेची ऑन द स्पॉट व्हिडिओद्वारे माहिती घेतली तेव्हा एका सिझरसाठी हजार रुपयेप्रमाणे तर गर्भ राहिला असेल तर दीड हजार रुपयांप्रमाणे पैसे घेण्यात आले. ज्या महिलांचे अगोदर सिझर झालेले असेल आणि ती महिला कुटुंबनियोजन करण्यासाठी आलेली असेल तर तिच्याकडून 2 हजार रुपये तर पिशवी साफ करण्यासाठी दीड हजार रुपये डॉक्टरांनी घतेल्याचे रुग्ण महिलेचे नातेवाईक अनिल बडे (रा. बडेवाडी) यांनी सांगितले. सविता सुमन आव्हाड यांच्याकडून हजार रुपये तर राधा मोहन ढाकणे यांच्याकडून अडीच अहजार, गीता रोमण (रा. आनंदवाडी) यांच्याकडून एक हजार रुपये, सुनिता बाबू जायभाये (रा. शिरूर पिंपळनेर) पिशवी साफ करण्यासाठी पंधरा हजार रुपये मागण्यात आले. तिच्याकडे केवळ एक हजार रुपये होते तेव्हा डॉक्टरांनी आणखी पाचशे असतील तरच ऑपरेशन केले जाईल, असे म्हणत तिला ऑपरेशन थिएटरबाहेर काढण्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्या महिलेने अन्य महिलांकडून घेऊन पाचशे रुपये डॉक्टरांना दिले. एवढेच नाही तर ऑपरेशन केलेल्या महिलांना कॉटही देण्यात आलेले नव्हते. वार्डाच्या एका पोर्चमध्ये सतरंजी टाकून या महिलांना झोपवण्यात आले होते. सदरचा प्रकार अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे. शिरूरच्या प्राथमिक आरोग्य केेंद्रातला हा भोंगळ कारभार आणि लाचखोरीचा धंदा सायं. दैनिक बीड रिपोर्टरने आज उघडकीस आणला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हाधिकार्यांसह जिल्हा शल्यचिकित्सक आणी संबंधित अधिकार्यांनी घेऊन पैसे घेणार्या डॉक्टरांसह प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अस्वच्छता आणि
लाचखोरीचा दवाखाना
शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्र हे अस्वच्छतेचे माहेरघर असल्याचे आज दिसून आले. इथले व्यवस्थापन अत्यंत ढिसाळ, कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केलेले असताना साधी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली गेलेली नव्हती. नातेवाईकांना तब्बल एक कि.मी.वरून पिण्याचे पाणी आणावे लागत होते. येथे रुग्णालयामध्ये जे डॉक्टर वाघमारे नामक वैद्यकीय अधिकार्याने शस्त्रक्रिया केल्या त्यांनी रुग्ण महिलांसह नातेवाईकांकडून पैशाची मागणी केली आणि पैसे घेतल्यानंतरच शस्त्रक्रिया केली
ही गंभीर आणि धक्कादायक बाब आहे.