बीड (रिपोर्टर): पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते बीड जिल्हा पोलीस दलाकरिता दहा नवीन गाड्यांचा हस्तांतरण सोहळा आज सकाळी पोलीस मुख्यालय येथे पार पडला. पोलीस दलाला सक्षम बनविण्यासाठी आणखी वीस गाड्या देणार असल्याचे या वेळी पालकमंत्री अतुल सावे म्हणाले.
बीड जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत 30 ते 35 गावे आहेत. शेवटच्या गावात घडलेल्या घटनास्थळी तत्काळ जाण्यासाठी पोलिसांकडे चांगले वाहने असणे गरजेचे आहे, मात्र बीड पोलीस दलात जवळपास सर्वच पोलीस ठाण्यात भंगार वाहने आहेत, त्यामुळे हद्दीतील शेवटच्या गावात घडलेल्या घटनास्थळी पोलिसांना तत्काळ जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. रात्री पेट्रोलिंगसाठी गाड्या चांगल्या नसतात. एखाद्या घटनावेळी आरोपींचा पाठलाग करतानाही खराब वाहनामुळे पोलिसांसमोरून आरोपी पसार होतात. त्यामुळे पोलीस दलात चांगले वाहन असणे गरजेचे आहे. आज बीडचे पालकंमत्री अतुल सावे यांच्या हस्ते बीड पोलीस दलाला नवीन दहा गाड्या सुपूर्द करण्यात आल्या. येणार्या काळात लवकरच आणखी 20 गाड्या देणार असल्याचे पालकमंत्री सावे म्हणाले. या वेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचीन पांडकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.