सेटिंग आणि धतिंगच्या धंद्यातले गँगवॉर
अंबाजोगाई (रिपोर्टर) बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे पहावयास मिळत असून गुन्हेगारी स्वरुपाचे लोक थेट एकमेकांच्या जिवावर उठले आहेत. गेल्या छत्तीस तासात बीड जिल्ह्यात गंभीर स्वरुपाच्या घटना घडल्या आहेत. पाटोदा तालुक्यात एका वृद्धाचा निर्घृण खून करण्यात आला तर रात्री बीडमध्ये दोन गटात तुंबळ राडा होत थेट एकमेकांवर गोळीबार आणि तलवारीने हल्ला करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच रात्री अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा (बु.) येथील 40 वर्षीय ऊसतोड कामगाराच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती कळताच घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी भेट दिली आहे.
महादेव गुरुबा काळुंके ( वय 40, रा. धानोरा खुर्द, ता. अंबाजोगाई, बीड) असं खून झालेल्या ऊसतोड मजुराचे नाव आहे. अगदी राहत्या घरापासून 100 मीटर अंतरावर सदरील घटना घडली आहे. महादेवचा चुलत भाऊ रात्री दीड वाजताच्या दरम्यान प्रात विधीसाठी जात असताना महादेव हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचा दिसला त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मृत्यू झाल्याचे
लक्षात आल्यानंतर त्याने घटना घरच्यांना सांगितली. महादेवचा एक कान देखील तुटल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती समाजातच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस पहाटे 3.00 वाजताच्या दरम्यान घटनास्थळी दाखल झाले यावेळी त्यांच्या सोबत उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले हेही उपस्थित होते. घटनेची प्राथमिक माहिती घेऊन सदरील मृतदेह हा अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान सदरील घटना कोणत्या कारणामुळे घडली हे तपासात समोर येणार आहे. महादेव काळुंके हा ऊसतोड मजूर होता. घरातील कर्ता असल्याने त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे. चार वर्षांपूर्वी त्याच्या मोठ्या मुलीचं लग्न झालेले आहे. तर एक 13 वर्षाची मुलगी, 9 वर्षाचा मुलगा, पत्नी असा परिवार आहे.