बोगस बी-बियाणांसह किटकनाशके,
खत विकेत्यांवर गृहविभागाची करडी नजर
बियाणे उगवले
नाही तर दुकानदारांवर फसवणुकीचा गुन्हा
बीड (रिपोर्टर): राज्यात मोठ्या प्रमाणावर बोगस बी-बियाणांसह किटकनाशकाची विक्री करून सर्वसामान्य शेतकर्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर राज्याच्या सचिवांनी याची महत्वपुर्ण दखल घेत काल राज्यभरातील जिल्हा पोलीस अधिक्षकांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेत बोगस बियाणे, किटक नाशके विकणार्या कृषी दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर बीड जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी कृषी दुकानदारांसह शेतकर्यांना आवाहन करत बोगस बी-बियाणे आणि किटक नाशके विकले तर गंभीर स्वरुपाचे आणि शेतकर्यांना फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल करू, असे म्हटले आहे. त्याचबरोबर ज्या कुठल्या शेतकर्याची फसवणूक झाली असेल त्याने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.
याबाबत अधिक असे की, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस बी-बियाणांसह किटक नाशकांची अनाधिकृत विक्री केली जाते. बीड जिल्ह्यात जादा भावाने बी बियाणे आणि खते विकल्याची ओरड सातत्याने होते. बोगस बियाणांचीही विक्री केली जाते. अनेक ठिकाणी बी-बियाणांसह बोगस किटक नाशके हे अनाधिकृतपणे विक्री केले जातात. याची गंभीर दखल राज्याच्या मुख्य सचिवांनी घेतली. काल मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील पोलीस अधिक्षकांची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत बीड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सहभाग घेतला होता. बैठकीमध्ये बोगस अथवा भेसळयुक्त खते, बियाणे, किटकनाशके यांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा बियाणे उगवले नाही तर विक्री करणार्या संबंधितांवर शेतकर्यांची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शेतकर्यांबाबत कृषी विभागापाठोपाठ आता गृहविभागही सतर्क होत हरकतमध्ये आल्याचे दिसून येते.
खबरदार! शेतकर्यांची फसवणूक कराल तर
बोगस बियाणांबाबत पोलिसांना माहिती द्या -ठाकूर
बीड जिल्ह्यात बोगस बी-बियाणांसह खत आणि किटकनाशकाची विक्री होत असेल, शेतकर्यांची फसवणूक केली जात असेल तर याची माहिती तत्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला द्या, संबंधितांबाबत तक्रार द्या, त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील. शेतकर्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी शेतकर्यांसह सुजान नागरीकांनी दक्ष रहावे. सदरचा गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले आहे.
धनंजय मुंडेंच्या मागणीवर सरकारचा निर्णय
गेल्या आठ दिवसांपूर्वी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी बोगस बी-बियाणे, खत विक्री करणार्यांचे मोठे रॅकेट बीड जिल्ह्यासह मराठवाडा आणि राज्यात सक्रिय आहे, त्याचबरोबर कब्बडी कपाशी बियाणांची जादा दराने विक्री केली जात असल्याची तक्रार कृषी मंत्र्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर शासन-प्रशासन व्यवस्था खडबडून जागे झाली आणि काल राज्याचे मुख्य सचिव यांनी बोगस बी-बियाणे, खत आणि किटक नाशके विक्री करणार्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले.