आषाढी एकादशी-बकरी ईद एकाच दिवशी आल्याने
बीडमध्ये बकरी ईदची कुर्बानी दुसर्या दिवशी
मोमीनपुरा
भागात कुरेशी समाजाच्या बैठकीत निर्णय
बीड (रिपोर्टर):- आषाढी एकादशी आणि बकरी ईद ही एकाच दिवशी 29 जून गुरुवार रोजी आल्याने बीड शहरातल्या मुस्लिम बांधवांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेत त्यागाची भावना ठेवून बकरी ईद दिवशी कुर्बानी न ठेवता ते दुसर्या दिवशी ठेवली जाणार आहे. याबाबत आज कुरेशी (खाटीक) समाजाची एक महत्वपूर्ण बैठक झाली आणि त्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
आषाढी एकादशी निमित्त वारकर्यांची वारी पंढरीकडे कुच करत आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला आसुसलेले महाराष्ट्रातले लाखो भाविक हे वारीत गेले आहेत. प्रत्येक वर्षी आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे वेगवेगळ्या दिवशी येते यावर्षी मात्र आषाढी एकादशी आणि मुस्लिम धर्माचा महत्वपूर्ण सण बकरी ईद हा 29 जून गुरुवार रोजी एका दिवशी आला आहे. बकरी ईद दिवशी बकर्याची कुर्बानी दिली जाते, यावर्षी मात्र ईद दिवशी ही कुर्बानी दिली जाणार नाही, आज मोमीनपुरा भागामध्ये कुरेशी (खाटीक) समाजाची एक महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये एकमुखाने बकरी ईद दिवशी दिली जाणारी कुर्बानी ही दुसर्या दिवशी म्हणजे 30 जून रोजी दिली जाणार असल्याचे ठरले. आषाढी एकादशी निमित्त हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.