एकादशीच्या अगोदर नारायण गड रस्ता रहदारी योग्य
करण्याच्या सुचना गावातील विकास कामांचे भूमिपूजन
आणि सुरू असलेल्या कामांची पाहणी
बीड दि.26 (रिपोर्टर): आ.संदीप क्षीरसागर यांनी राजुरी(न.) गावासह बीड तालुक्यातील ग्रामीण भागात आज दौरा केला व विकास कामांचे भूमिपूजन केले. सुरू असलेल्या कामांची पाहणी करून आढावा घेतला. तसेच नवगण राजुरी ते खरवंडी (कासारी) रस्त्याचे काम बर्याच दिवसांपासून बंद होते हे काम स्वतः उपस्थित राहून सुरू करून घेतले. हा रस्ता धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडकडे जाणारा असल्यामुळे आषाढी एकादशीच्या अगोदर हा रस्ता भाविकांसाठी रहदारी योग्य करण्याच्या सुचनाही यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांनी संबंधित अधिकार्यांना केल्या.
नवगण राजुरी ते खरवंडी (कासार) रस्त्याचे काम बर्याच दिवसांपासून बंद होते. या संदर्भात गेल्या महिन्यात आ. संदीप क्षीरसागर यांनी अधिकार्यांसोबत बैठक घेऊन काम सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. यावर आज प्रत्यक्ष उपस्थित राहून या कामाची सुरुवात करून घेतली. हा रस्ता धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडकडेही जातो. आषाढी एकादशीला शेकडो भाविक नारायण गडावर दर्शनासाठी येत असतात. हा रस्ता लवकर रहदारी करण्यात यावा, जेणेकरून एकादशीनिमित्त येणार्या भाविकांची गैरसोय होऊ नये. असे निर्देश आ.संदीप क्षीरसागर यांनी संबंधित अधिकार्यांना दिले आहेत. यावेळी माजी आ.सय्यद सलीम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन गावातील
विकास कामांचे भूमिपूजन
आ.संदीप क्षीरसागर यांनी ग्रामदैवत गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन राजुरीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन केले. यावेळी मंगलमूर्ती देवस्थानच्या आवारात भव्य डोम स्वरूपाच्या सभामंडपाचे भूमिपूजन केले. गावातंर्गत दोन सिमेंट रस्त्याचे व हनुमान मंदिराच्या सभामंडपाचेही भूमिपूजन केले. तसेच गावातील सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाची पाहणी यावेळी अधिकारी व ग्रामस्थ यांच्यासोबत केली.