Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख- बुरसटलेल्या मानसिकतेचे नाव निर्भया ती निर्भय आणि आत्मनिर्भरच

अग्रलेख- बुरसटलेल्या मानसिकतेचे नाव निर्भया ती निर्भय आणि आत्मनिर्भरच


गणेश सावंत
मो. नं. ९४२२७४२८१०
अभिमान, स्वाभिमान अन् छप्पन इंचाच्या निधड्या छातीची भाषा करणार्‍या आम्हा भारतीयांच्या घरात खरच निर्भया निर्भय आहेत का? हा सवाल आज रक्षा बंधनाच्या निमित्ताने प्रत्येकाने स्वत:ला विचारायलाच हवा. आजही अखंड भारतात सामाजिक दृष्टीकोन याची देही याची डोळा पाहताना समाजात ज्या देशात दर ७८ मिनिटांनी एक हुंडाबळी जातो, दर ५९ मिनिटांनी एक महिलेवर लैंगिक अत्याचार होतो, दर ३४ मिनिटांनी बलात्काराचे एक प्रकरण घडते, दर १२ मिनिटांनी एका महिलेला शारीरिक अत्याचाराला सामोरे जावे लागते आणि तीन मुलींपैकी एकीला हुंड्यासाठीचा मानसिक-शारीरिक छळ सहन करावा लागतो, तो देश आणि तो समाज स्त्रियांसाठी सुरक्षित आहे, असे म्हणता येईल का? उत्तर नकारार्थी येत असले तरी यासाठी सरकारी यंत्रणा नव्हे, तर आपली सामाजिक रचना आणि विविध प्रकारच्या रुढी-परंपरा, समाजाची बुरसट मानसिकताच जबाबदार आहे, असे म्हणणे आतिश्योक्ती ठरू नये. वंशाचा दिवा म्हणून आजही मुुलाकडेच पाहिले जाते, मुलीला पोटातच ठार मारण्याचे कारस्थान केले जाते. मुुलगा होत नसेल तर स्त्रीला दोष दिला जातो आणि अनेकदा मुलगा व्हावा म्हणून स्त्रीला अनेक बाळंतपणांना सामोरं जावं लागतं. यात अनेक महिलांना प्राणही गमवावे लागतात. वास्तविक, मुुलगा किंवा मुुलगी होणं हा स्त्रीचा दोष नाही. पण, वैद्यक शास्त्राचं ज्ञान नसल्याने आपल्याकडे मुलीच्या जन्मासाठी स्त्रीलाच जबाबदार ठरवून तिच्यावर अत्याचार केले जातात आणि या अत्याचारात आणि छळात घरातली जेष्ठ स्त्री सहभागी असते हे विशेष.


स्त्री ही भोगाची वस्तू
आहे हा बुरसटलेला मानसिक दृष्टीकोन जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत स्त्रीयांवर अत्याचार होत राहणार आहेत. हा नुसता बुरशी आलेला दृष्टीकोन नव्हे तर मिशावर ताव मारत हाबूक ठोकणार्‍या आणि पुरुषत्वाचा टेंभा मिरवणार्‍या पुरुषप्रधान संस्कृतीचा अतिरेक म्हणावा लागेल. स्त्रीयांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याची भाषा न करता तिच्या स्वातंत्र्याचे गुणगाण गाणारेच घरात अथवा अवतीभोवती तिच्या शरीराकडे सौंदर्यदृष्टीतून पाहण्यापेक्षा वासनायुक्त नजरेतून पाहत तिच्यावर टॉंग मारत असतील तर तोही तिच्यावर बलात्कारच म्हणावा लागेल. स्त्री स्वातंत्र्याची मानसिकता केवळ दुसर्‍याच्या घरामध्ये पाहणारे आणि बाळगणारे स्वत:च्या घरात स्त्री स्वातंत्र्यावर गदा आणणारे जोपर्यंत आहेत तोपर्यंत स्त्रीचे स्वातंत्र्य तिला मिळेल हे कठीणच. इथे मिनिटावर आणि सेकंदावर स्त्री अत्याचार होत असतील, बलात्कार होत असतील तर आम्हाला संस्कार आणि संस्कृतीचा टेंभा मिरवण्याचा मुळीच अधिकार नाही हे स्पष्टपणे इथे मांडावे लागेल. ज्या दृष्टीकोनातून आणि मानसिकतेतून आजचा समाज स्त्रीयांकडे पाहतो तोच दृष्टीकोन शासन आणि प्रशासन दरबारी राज्यकर्त्यांकडून आणि नोकर बाबुंकडून उघड उघड पहायला मिळतो. स्त्रीयांवरील अत्याचार रोखण्याऐवजी ते का वाढले? याचे स्पष्टीकरण देताना तुघलकी कारण जेव्हा पुढे केले जाते तेव्हा मात्र सामाजिक मानसिकतेची किव करावीशी वाटते.


एकट्या बीड जिल्ह्यात
गेल्या सात ते आठ महिन्याच्या कालखंडात स्त्री अत्याचाराच्या घटनांचा आकडा पाहितला तर आजही आपण स्त्रीयांकडे कुठल्या नजरेने पाहतो याचे उत्तर मिळते. ६३८ महिला अत्याचाराचे गंभीर गुन्हे जर एकट्या बीड जिल्ह्यामध्ये घडत असतील आणि या गुन्ह्यांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराचे २४४ प्रकरणे, बलात्कारसारखे ८५ प्रकरणे, मुलींना पळवून नेणे ५९ गुन्हे आणि छेडछाडीचे ६ गुन्हे घडत असतील तर अखंड भारतात या गुन्ह्यांचा आकडा तो किती असेल. आपण एखाद दुसर्‍या बलात्काराच्या गंभीर प्रकरणाला देश पातळीवर आक्रमकतेने चर्चीत पाहतो परंतु तशा अनेक निर्भया विनाचर्चित सरणावर गेलेल्या असतात. बीड जिल्ह्यात स्त्री अत्याचाराचे प्रमाण वाढले. याविषयी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे विचारणा केली असता पोलीस अधिक्षकांनी स्त्री अत्याचाराचे वाढते कारण लॉकडाऊन असल्याचे सांगितले. लॉकडाऊनमध्ये सर्वजण घरात असतात. अशातून छोट्या-मोठ्या किरकोळ कारणातून वाद होतो आणि त्या वादातून घटना घडतात. हे आम्ही काही प्रमाणात मान्यही करू. परंतु महिलांची अब्रू लुटणे, तिला जीवंत जाळण्यापर्यंत मजल जाणे, तिला उचलून नेऊन तिच्यासोबत दुष्कर्म करणे, याचे कारण तर लॉकडाऊन नसेल परंतु जी मानसिकता समाजातील पुरुष प्रधान व्यवस्थेची आहे तीच मानसिकता नोकर दरबारीही दिसून येते. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना तात्काळ नोंदवणे आणि गुन्हेगारांवर कारवाई करणे हे आद्य कर्तव्य व्यवस्थेचे असायला हवे. मात्र हीच व्यवस्था जेव्हा स्त्रीयांकडे संशयाने पाहते तेव्हा एकप्रकारे स्त्री अत्याचाराला ती मदत करत असते. खरंतर महिला ही दुबळी नाही तर ती बलशाली आहे. ती स्वत:चं रक्षण करू शकते हे जोपर्यंत पुरुषप्रधान संस्कृती


महिलांना आत्मबल
देणार नाही आणि स्त्रीयांचे रक्षण करण्याची जबाबदारी पुरुषांवर असते आणि पुरुषच स्त्रीचे रक्षण करू शकतो अशी मान्यता शेकडो वर्षापासून आपल्याकडे आहे. वास्तविक स्त्रीयांना रक्षणाची आवश्यकता आहे असे मानण्याची गरजच नाही. स्त्रीयांनी हे समजून घेतले पाहिजे की, कुठल्याही परिस्थितीत स्त्री आत्मबलाने स्वत:चा बचाव करू शकते. शारीरिक बलाच्या आधारावर अवलंबून राहण्याऐवजी आत्मिक बलाच्या आधारावर जगण्याची कला स्त्रीयांनी अवगत करणे आज गरजेचे आहे . आजच्या युगात समाजाने स्त्रीचे सारे जीवन शरीरपरायण करून टाकले आहे. आपण सौंदर्यविषयक विचार करतानाही तिच्या शरीरपरायणतेवरच थांबतो. जोपर्यंत ही शरीरपरायणता राहील तोपर्यंत स्त्रीयांच्या मनात भीती कायम राहील. तोपर्यंत स्त्री मुक्त होऊ शकणार नाही. प्राचीन काळातही स्त्रीवर अत्याचार झाले. आधुनिक काळातही अत्याचारी लोक स्त्रीच्या मनातील भीतीचा गैरफायदा घेत असल्याचेच दिसते. कायदा करून स्त्रीवरील अत्याचार थांबणार नाहीत. तिच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल झाल्यास तिच्यावरील अत्याचार थांबतील. सीतेचे वर्णन आपण रामायणात वाचतो. सीतेजवळ स्वसंरक्षणाची कोणतीच साधने नव्हती . तरीही रावण सीतेचे काहीच करू शकला नाही . कारण सीतेजवळ निर्भयता होती. आपल्याकडे निर्भया कायदा झाला, पण स्त्री निर्भय झाली नाही. ती निर्भय झाली तर आपोआप अत्याचाराला लगाम बसेल. आजच्या स्त्रीयांनी अशी अढळ श्रद्धा ठेवायला हवी की, पुरुष स्वतचे रक्षण करण्यास अनेकदा असमर्थ ठरतो तरीही तो रक्षण करण्यास समर्थ आहे, असे मानले जाते. तशीच आत्मनिष्ठा, आत्मबल, आत्मनिर्भयता स्त्रीने स्वतत निर्माण केली पाहिजे. आजची स्त्री सुरक्षित असून चालणार नाही . ती स्वतचे रक्षण करण्यास समर्थ झाली पाहिजे. स्त्रीयांमध्ये स्वतचे रक्षण करण्याचे सामर्थ्य नाही असा गैरसमज आहे, पण विज्ञानाने हे सिद्ध केलेले आहे की, पुरुषांपेक्षा स्त्रीयांमध्ये प्रतिकारशक्ती अधिक असते. स्त्रीचे शरीर रक्षण करण्यासाठी पुरुषांपेक्षा अधिक समर्थ असते. आजायची सेवा, शुश्रूषा करण्यामध्ये पुरुषाला दोन – तीन महिने जागरण करण्याची वेळ आली तर तो स्वत आजारी पडतो, परंतु स्त्रीया मात्र ही सेवा- शुश्रूषा करून घरकाम सांभाळतात व सेवा करण्यासाठी, तगही धरतात. नोकरी करणारी स्त्री सर्व गृहकृत्ये करून कुटुंबाचा सांभाळ करते व अर्थार्जनही करते. याउलट पुरुष नोकरी करण्यात धन्यता मानतो. एक अंगाने पुरुष कर्तबगार आहे मात्र स्त्री दोन्ही अंगाने कर्तबगार दिसून येते. त्यामुळे आता बेटी पढाओ बेटी बढाओचे नारे देण्यापेक्षा ती कर्तृत्ववान होती, आहे आणि राहील हा विश्वास तिला द्या.

Most Popular

error: Content is protected !!