आषाढी निमित्त गावगावचे
देवालय भक्तांनी फुलले
बीड(रिपोर्टर): खेळ मांडिरेला वाळवंटी ठाई । नाचत वैष्णव भाई रे ॥ धृ ॥ क्रोध अभिमान केला पावटणी। एकाएका लागतील पारा रे ॥ 1 ॥ असं म्हणत आषाढी एकादशीनिमित्त धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या नारायणगड, भगवानगड सह कपीलधार श्रीक्षेत्र चाकरवाडी, पोखरी येथील प्रमुख मंदिरांसह गावगावातल्या विठ्ठल मंदिरात भाविकांनी आज मोठी गर्दी केली होती. विठ्ठल नामाचा गजर करत भक्तीभावाने अवघ्या महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यातल्या विठ्ठल भक्तांनी, वारकर्यांनी आपल्या विठुरायाचे दर्शन घेतले. नारायणगड, कपीलधार, गोरक्षनाथ टेकडी, श्रीक्षेत्र चाकरवाडी यासह अन्य देवालयांमध्येही भाविकांची मोठी गर्दी पहावयास मिळाली.
धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या नारायणगड या ठिकाणी हजारोंच्या उपस्थितीत वारकरी विठ्ठलभक्तांनी विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी मोठमोठ्या रांगा लावल्या होत्या. पहाटपासूनच विठ्ठल दर्शनाची ओढ लागल्याने जो तो विठ्ठलाला आपल्या डोळ्यात सामावण्यासाठी आतुरलेला होता. नारायणगड या ठिकाणी दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लागल्याचे पहावयास मिळाले. ह.भ.प. शिवाजी महाराज यांनी आज सकाळी महापुजा केली. तर तिकडे भगवानगडावर ह.भ.प. नामदेव शास्त्री यांनी विठ्ठलाची महापुजा केली. भगवानगडावरही हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून येत होती. कपीलधार, चाकरवाडी, पोखरी येथील विठ्ठल मंदिरातही हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी रांगा लावून होते. बीड जिल्ह्यातल्या गावागावांमध्ये विठ्ठल मंदिरांसह अन्य देवालय भक्तांनी फुलून गेल्याचे पहावयास मिळाले.