बीड (रिपोर्टर): शिक्षणासह अन्य कामांकरीता पोलीस ठाण्यातल्या काही प्रमाणपत्रांची गरज भासते. विद्यार्थ्यांचा टीसी असो अथवा अन्य कागदपत्रे,, मोबाईल हरवल्यानंतर पोलीस ठाण्यात जावून माहिती देत त्यांचं प्रमाणपत्र घ्यावं लागतं, मात्र बीड शहरातल्या पेठ बीड पोलीस ठाण्यात असलेल्या डीएसबी विभागातील कर्मचारी छोट्याशा कामासाठी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. या तक्रारींची दखल घेत ठाणेप्रमुखांनी अथवा पोलीस अधिक्षकांनी संबंधित डीएसबीच्या कर्मचार्याला समज देत लोकांचे कामे वेळेवर करण्याचे निर्देश द्यावेत.
पेठ बीड पोलीस ठाणेअंतर्गत डीएसबी विभागाकडे कुठलेही काम असले की त्या ठिकाणी किमान पाचशे रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत पैसे द्यावे लागत असल्याची चर्चा होत आहे. वर्तवणूक प्रमाणपत्राची पासपोर्टपासून नोकरीचा अर्ज दाखल करण्यापर्यंत लागते. मुलांचे टीसी हरवले, मोबाईल हरवला अथवा अन्य कुठलेही छोटे-मोठे काम त्या त्या पोलीस ठाणेअंतर्गत असलेल्या डीसीबीच्या कर्मचार्यांकडे असते. पेठ बीड ठाण्यातील डीएसबीचे कर्मचारी हे सर्वसामान्यांचे काम तात्काळ करण्यापेक्षा जोपर्यंत संबंधित व्यक्ती टेबलाखालून काही देत नाही तोपर्यंत त्याचे काम होत नाही. येथील कर्मचार्यांबाबत सातत्याने ओरड येते. नुकतेच पेठ बीड पोलीस ठाण्याला अधिकृत ठाणेदार मिळाले असून त्यांनी सर्वप्रथम संबंधित डीएसबी कर्मचार्यांची कानउघाडणी करावी आणि पोलीस अधिक्षकांनी सर्वसामान्यांची कामे रितसर आणि तात्काळ विनामूल्य करण्याच्या सूचना डीएसबी विभागातील कर्मचार्यांना द्याव्यात.