महाराष्ट्राला राजकीय भूकंप नवे राहिले नाहीत. दुर्दैव याचं वाटतं महाराष्ट्राची निष्ठा अन् गनिमी कावा हा देशातच नव्हे तर परदेशातही चर्चेत असतो. निष्ठेबाबत आदर असते, तर गनिमी काव्यांबाबत कुतुहल असते, मात्र गेल्या चार वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्रात जो राजकीय तमाशा महाराष्ट्रातील जनतेला पहावयास मिळत आहे त्यावरून महाराष्ट्राची जनता किती संतापली हे निवडणूक आयोगाने बोटाला शाई लावण्याऐवजी चुना लावावा, या मिम्सवरून दिसून येते. काल पुन्हा महाराष्ट्रात एक मोठा भूकंप झाला. भाजपाने शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली आणि पुतणे अजित पवारांना सत्तेत सामावून घेतले. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पॉवर गेम होता का? हे शोधताना अमेरिकेवरून परतल्यानंतर मोदींनी पवारांवर जो नेम धरला आणि कटाक्ष टाकला तेव्हाच राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू ठरला.
खरं पाहिलं तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सेना-भाजपात जे झालं तेव्हाच शरद पवारांनी गरज पडली तर भाजपाला बाहेरून पाठिंबा देऊ, असे म्हणून भाजपेयींना आपल्या काठावर आणून ठेवले होते, आपण भाजपाला राष्ट्रवादीच्या काठावर आणून ठेवले आहे, आपले पुतणे अजित पवार हे अस्थिर आहेत हे माहित असताना पवारांचा तो बाहेरून पाठींबा देण्याचा कावा भविष्यात भाजपसाठी मेवा ठरेल, हे पवारांना वाटत नव्हतं. भाजप आणि शिवसेनेत फाटलं त्याक्षणी अजित पवारांनी पहाटे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि भाजपासोबत संधान बांधलं. तेव्हा शरद पवारांनी आपली ताकद दाखवली आणि अवघ्या तीन दिवसात देवेंद्र फडणवीस-अजित पवारांचं सरकार कोसळलं. त्या कालखंडात पवारांनी केलेली प्रत्येक खेळी ही राजकीय गनिमी कावा होता हे स्पष्ट झाले मात्र त्यानंतर अंदर की बात करताना शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे कायम भेटत राहिले. गेल्या चार वर्षांच्या कालखंडामध्ये एकदा फुटीचा गंध दरवळल्यानंतरही भाजप राष्ट्रवादीच्या अंगावर आक्रमकपणे गेल्याचे दिसून आले नाही. याचाच अर्थ भाजप आणि राष्ट्रवादी त्यावेळी गुफ्तगू करत असे. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातली गुफ्तगू आणि देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यातल्या गुफ्तगू फारसा अंतर तो शरद पवार हे भाजपाला झुलवित होते आणि अजित पवार हे सत्ता केंद्रासह ईडीपासून आपली चमडी वाचवत होते. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये अजित पवारांनी पुन्हा एकदा बंडाचं निशान फडकवलं, अदानीसारखा मातब्बर उद्योजक मोदींचा दूत होत (पान 5 वर)
शरद पवारांकडे आला, अजित पवारांचं बंड त्यावेळी थंड झालं. मात्र हा दूत होता की, कोल्हा हे कालच्या राजकीय भूकंपानंतर उभ्या महाराष्ट्राला पाहाता आला. अनेक जणांना या फुटीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बलाढ्य हात आहे असे उघड वाटते परंतु या फुटीला शरद पवारही तेवढेच जबाबदार आहेत, हे गेल्या चार वर्षांच्या कालखंडात घडलेल्या घटनाक्रमावरून वाटते. गेल्या वर्षी शिवसेना फोडून भाजपाने राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार पाडलं. शिंदेंना मुख्यमंत्री करत भाजप सत्तेत आलं, मात्र इथं मुख्यमंत्र्यांसह सोळा आमदार कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने ऐन लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची सत्ता जाईल अणि लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षित खासदारांचं संख्याबळ भाजपाला मिळणार नाही अशा वेळी मोदी यांनी टोकाचा निर्णय घेतला अन् अमेरिकेवरून भारतात आल्याबरोबर एका जाहीर सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातले सर्व पक्ष-संघटना, विरोधक सोडून देत केवळ शरद पवारांना टार्गेट केले. एकतर्फी शरद पवारांवर टीकेचे बाण सोडले. त्याच वेळी आता भाजपाचा संयम तुटला, शरद पवार आणखी भाजपाला खेळवित ठेवू शकत नाहीत हे समजायला जाणकारांना वेळ लागला नाही. जसेच मोदींनी शरद पवार टार्गेट केले, शरद पवारांवर टीकेची झोळ उठविली तसेच महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी टेलिव्हिजन चॅनलना दिलेल्या मुलाखतीमध्ये पहाटेच्या शपथविधीबाबत गौप्यस्फोट केला. तो शपथविधी आणि ती कारस्थाने शरद पवारांना माहित होते, हे स्पष्ट झाल्यानंतर आणि फडणवीसांनी ते गचकरण खाजवल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोदी-फडणवीसांनी कटाक्ष टाकले हे सर्वसामान्य जाणते झाले. मोदींना अडचणीच्या काळात आपण मदत करू, असे जर पवारांचे लक्ष्य असेल आणि त्या लक्ष्याच्या आधारावर मोदी हे चार वर्षे अभिलाषा ठेवून असतील तर शेवटच्या टप्प्यात जेव्हा पवारांनी भूमिका बदलली, देशभरात केंद्र सरकारविरोधात वज्रमूठ बांधायला सुरुवात केली आणि तिथेच राजकारणातला हा भिष्म तिरावर रहावा, म्हणून काल भाजपाने हा नेम आणि गेम केला. मात्र शरद पवार हे आजही तरणेबांड होत ‘हे मला नवे नाही,’ असे म्हणत गुरू पौर्णिमेच्या दिवशी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले. आता येणारा काळच पवारांचा नेम आणि पॉवर गेम सांगून टाकेन.