इन्फंट इंडियातील मुलांना पालीत शिक्षणासाठी विरोध, सीईओंना दिले निवेदन
बीड (रिपोर्टर): इन्फंट इंडिया येथे पाचवीपर्यंत शाळा असतानाही तेथील विद्यार्थी पाली येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांनी इन्पंट इंडिया येथेच शिक्षण घ्यावे, पालीच्या जि.प. शाळेत येऊ नये, यासाठी आज पाली येथील पालकांनी थेट जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकले अन् सीईओंना निवेदन दिले. जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही शाळा सुरू होऊ देणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला.
बीड तालुक्यातील इन्फंट इंडिया येथे एचआयव्हीग्रस्त मुले आहेत. त्या मुलांसाठी इन्फंट इंडिया येथेच पाचवीपर्यंत शाळा आहे. तेथे दोन शिक्षकही कार्यरत आहेत. मात्र तरी देखील तेथील मुलं पाली येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणासाठी येतात. पाली येथील पालकांनी ते इन्फंट इंडिया येथेच शिकावेत, पाली येथे येऊ नये याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र तरी देखील इन्फंट इंडियाची
मुले पाली येथे शिक्षणासाठी येत असल्याने आज सकाळी सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढत शाळेला कुलूप ठोकण्यात आले. याबाबत सीईओ अजित पवार यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. जोपर्यंत इन्फंट इंडिया येथील विद्यार्थी तेथेच शिक्षण घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही पालीची शाळा बंद ठेवणार, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.