दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू, अपघातानंतर दुचाकी पेटली
दुसर्या अपघातात दोन भाविक महिला ठार, अकरा मुलांसह 24 जखमी
बीड (रिपोर्टर): भरधाव वेगात निघालेल्या कारने शिक्षकांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने या भीषण अपघातात दोन्ही शिक्षक ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी बीडपासून काही अंतरावर असलेल्या म्हसोबा फाट्याजवळ घडली. अपघातानंतर शिक्षकांच्या दुचाकीने पेट घेतला होता. दुसरा अपघात उदंड वडगाव फाट्याजवळ रात्रीच्या दरम्यान झाला. परभणीहून काळुबाईच्या दर्शनाला निघालेल्या पिकअपला एसटी बसने धडक दिल्याने पिकअपमधील दोन महिला ठार झाल्या तर 24 जण जखमी झाले. या जखमींमध्ये अकरा मुलांचा समावेश आहे.
बीड येथील प्रा. शहादेव शिवाजी डोंगरे व प्रा. गव्हाणे अंकुश साहेबराव हे दोघे मोटारसायकलवरून शिरूर येथील कालिका देवी महाविद्यालयाकडे जात होते. नगर रोडवरील म्हसोबा फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला (क्र. एम.एच. 23 ए.एम. 8479) समोरून येणार्या क्रेटा कारने (क्र. एम.एच. 14 जे.ई. 5372) जोराची धडक दिली. या अपघातात डोंगरे, गव्हाणे हे दोन्ही शिक्षक गंभीररित्या जखमी होऊन ठार झाले. अपघातानंतर शिक्षकांच्या दुचाकीने पेट घेतला होता. या दुर्दैवी घटनेने बीड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. दुसरा अपघात उदंडवडगाव फाट्याजवळ घडला. परभणीहून बीडमार्गे काळुबाईच्या दर्शनाला काही भाविक-भक्त पिकअपद्वारे जात होते. या पिकअपला एसटी बसने धडक दिली. या अपघातात पिकअपमधील रंगुबाई साहेबराव जाधव (रा. बागीरोड परभणी) व मथुराबाई पांडुरंग गवाले (वय 72) या दोन महिला ठार झाल्या. इतर 24 जण जखमी झाले असून जखमींमध्ये 11 मुलांचा समावेश आहे.









