मुंबई (रिपोर्टर): सध्या महाराष्ट्रात आणि देशाच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. आज अजित पवार व शरद पवार गटाच्या स्वतंत्र बैठका मुंबईत आयोजित करण्यात आल्या होत्या. यात बोलताना दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकमेकांवर तुफान टीका-टिप्पणी केली. या पार्श्वभूमीवर एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधली फूट चर्चेत असताना दुसरीकडे शिवसेनेतील दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, ही शक्यता चक्क भारतीय जनता पक्षाच्या एका खासदाराने वर्तवली आहे!
भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी नेहमीच त्यांच्या ट्वीटमधून स्पष्ट भूमिका मांडताना दिसतात. या भूमिकांमधून ते अनेकदा स्वपक्षाच्याच विरोधात मत मांडताना दिसतात. या पार्श्वभूमीवर आज स्वामींनी केलेल्या एका ट्वीटची जोरदार चर्चा सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळातही पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरापासून एकमेकांवर टोकाला जाऊन टीका करणारे शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता सुब्रह्मण्यम स्वामी यांनी व्यक्त केली आहे. आपल्या कानावर ही बाब पडल्याचं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
स्वामींनी ट्वीटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमुळे शिंदे गट व ठाकरे गट एकत्र येणार असल्याचं स्वामी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मी मुंबईत आहे. शिवसेनेतील बंडखोर उद्धव ठाकरेंकडे परत जाऊ शकतात. कारण मोदींनी आधी त्यांचा वापर करून घेतला आणि नंतर त्यांना बाजूला सारून आता राष्ट्रवादी काँग्रेसला चुचकारण्याचा प्रयत्न केला जात आहे या गोष्टीमुळे ते अस्वस्थ झाले आहेत, असं मी ऐकलं, असं सुब्रह्मण्यम स्वामींनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.
शिंदे गटात नाराजी?
दरम्यान, ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपाबरोबर सरकार स्थापन केलं, त्याच राष्ट्रवादीला भाजपानं सोबत घेतल्यामुळे शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुब्रह्मण्यम स्वामींचं ट्वीट चर्चेचा विषय ठरलं आहे.
उद्धव-राज ठाकरे एकत्र येणार? अभिजित पानसेंनी
घेतली संजय राऊतांची भेट, युतीचा प्रस्ताव दिल्याची चर्चा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजित पानसे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची आज सामना कार्यालयात जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर लगेच संजय राऊत उद्धव ठाकरेंकडे मातोश्रीवर तर अभिजीत पानसे राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थावर गेले. त्यामुळे मनसेने अभिजित पानसे यांच्यातर्फे ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज संजय राऊत यांची आज सामना कार्यालयात भेट घेतली. दोघांमध्ये सामना कार्यालयात 15 मिनिटे चर्चा झाली. त्यापूर्वी दोघांनी भांडूप ते सामना कार्यालयातपर्यंत एकत्र कारने जवळपास सव्वा तास प्रवास केला. म्हणजेच या दोन्ही नेत्यांमध्ये आज जवळपास दीड तास चर्चा झाली. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, अभिजित पानसेंनी मनसेचा युतीचा प्रस्ताव संजय राऊत यांना दिला, अशी चर्चा आता रंगली आहे.