ठाकरे, पवार, भोसले, मुंडे, तटकरे, निलंगेकर, क्षीरसागर हे महाराष्ट्रातल्या राजकारणातले थोरले
काका मला वाचवा हो… ची गुहार पेशवाईमध्ये जी गुंजली ती गुहार आज पावेत पुणे परगण्यात ऐकावयास मिळत आहे. मात्र सह्याद्रीच्या या निधड्या महाराष्ट्रात ‘काका मला वाचवा..’ नव्हे तर काकांना वाचवा अशी आरोळी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून ऐकावयास मिळत आहे. दशकभराच्या कालखंडात महाराष्ट्राच्या राजकारणावर दबदबा करून सोडणार्या ठाकरे, मुंडे, पवार, तटकरे, क्षीरसागर या राजकारणातल्या थोरल्या घरांमध्ये खासकरून ‘काकांना वाचवा’ ची आरोळी उभ्या महाराष्ट्राने ऐकली आहे. महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे फुटीरतेचे समीकरण अशी नवी ओळख या चार वर्षांच्या कालखंडात पहावयास मिळत असतानाच राजकारणातले भीष्म म्हणून ज्या शरद पवारांकडे पाहितले जाते, त्या शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी बंड केल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात काका-पुतण्याच्या राजकीय लढाईची चर्चा होत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांनी आणि अमोल कोल्हे यांच्या समवेत राज ठाकरेंची ती मुलाखत आठवते का, या मुलाखतीमध्ये अमृता फडणवीस यांनी राजकीय नेत्यांना कोणते सल्ले द्याल, अशा आशयाचा प्रश्न राज ठाकरे यांना केला होता. त्या प्रश्नात एकनाथ शिंदे, अजित पवार, आदित्य ठाकरे यांचा उपप्रश्न होता. अजित पवारांच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी अजित पवार हे बाहेर इतकं लक्ष देतात, पण त्यांनी आपल्या काकांकडे लक्ष द्यावं, असा सल्ला ठाकरेंनी दिला होता. त्यावर अजित पवार यांनी ‘तुमच्या प्रमाणेच मी सुद्धा काकांकडे लक्ष देणार’, असे उत्तर दिले होते. तेव्हाच पवारांच्या घरात ‘वाचवा हो’ ची आरोळी ऐकावयास येणार, असे अंदाज बांधले जात होते. महाराष्ट्राला काका-पुतण्याची राजकीय लढाई नवी नाही. राजकीय इच्छाशक्ती असलेल्या राजकारणातल्या प्रत्येक व्यक्तीला एक विशिष्ट खुर्चीची अभिलाषा असते. ती खुर्ची मिळावी यासाठी तो प्रयत्नांची परिकाष्ठा करीत असतो. इथं पुतण्यापेक्षा रक्ताच्या नात्याला खुर्ची मिळावी यासाठी काकांची व्यूहरचना असते. याचे अनेक उदाहरण महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षांमध्ये पहायला मिळाले. अत्यंत संघर्ष आणि आक्रमकतेतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना मोठी केली. महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय पान हलत नाही, हे लक्षात आल्यानंतर आपला वारसदार हा आपला पुत्र असावा, हे गणित ठाकरेंनी मनामध्ये गिरवून ठेवलं. बालपणापासून त्यांच्या सोबत असलेले, भाषणातली आक्रमकता आणि शिवसेनाप्रमुखांच्या अंगातले व्यंगचित्राचे गुण अंगीकारणारे राज ठाकरे हे पुतणे असल्याने त्यांना राजकीय वारसा हक्कापासून दूर ठेवले. त्यामुळे गेल्या दशकभरापूर्वी बाळासाहेबांच्या हयातीत राज ठाकरे दूर झाले. त्यांनी नवा पक्ष काढला. आज त्याच शिवसेनेत मोठी फूट पहायला मिळाली. त्यापाठोपाठ महाराष्ट्राने थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाचे म्हणजेच उदयनराजे, अभयसिंहराजे भोसले या काका-पुतण्याच्या वादालाही महाराष्ट्राने अनुभवले. या दोघांमधला वाद उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. इ.स. 1989 पासून हा राजकीय वाद पहावयास मिळत असून दोघेही वेगवेगळ्या पक्षामध्ये दिसून येत आहेत. तिकडे रायगडमध्ये सुनील तटकरे विरुद्ध अवदूत तटकरे या काका-पुतण्यांचा वादही तेवढाच चर्चीत आहे. इकडे बीड जिल्ह्यात काका-पुतण्यांची राजकीय लढाई गेल्या दशकभराच्या कालखंडात उभ्या महाराष्ट्राने पाहिली.
भाजपाचे नेते स्व. गोपीनाथ मुंडे आणि पुतणे धनंजय मुंडे यांच्यातही तेच झाले जे शिवसेनाप्रमुख आणि राज ठाकरे यांच्यात झाले. लहनपणापासून धनंजय मुंडे हे स्व. गोपीनाथराव मुंडेंच्या सोबत असायचे. मात्र ऐनवेळी गोपीनाथरावांनी विधानसभेची उमेदवारी त्यांची कन्या पंकजा मुंडे यांना दिली आणि इथेच स्व. मुंडे व धनंजय यांच्यात ठिणगी पडली. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीत डेरेदाखल झाले. पुढे या दोघांमधला संघर्ष चांगलाच टोकाला गेला. मुंडे यांच्या घरातला काका-पुतण्यांचा वाद आणि वेगळे झालेल्या घरावरील चर्चा बंद होते ना होते तोच बीड जिल्ह्याच्या राजकारणात थोरले घर म्हणून ओळखल्या जाणार्या स्व. केशरकाकु यांच्या घरामध्ये काका-पुतण्याचा वाद उफळला. ज्या घरात तीन वेळेस खासदारकी आली, ज्या घरामध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांच्या माध्यमातून अनेक वेळा मंत्रिपदे आले त्या घरात जयदत्त क्षीरसागर यांच्या सोबत राहून त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना उभा जिल्हा जयदत्त क्षीरसागरांचा वारस पहात असताना ऐनवेळी जयदत्त क्षीरसागरांचे पारडे त्यांचे बंधू डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडे झुकले आणि गेल्या पाच वर्षांपूर्वी इथेही काका-पुतण्यात वाद झाले. थेट काकांविरोधात विधानसभा निवडणूक लढून संदीप क्षीरसागरांनी जयदत्त क्षीरसागरांना चितपट केले. यातून महाराष्ट्राच्या राजकारणात आणि राजकीय परिघात काकांवर पुतणे सातत्याने भारी पठरले. तिकडे अशोक पाटील निलंगेकर आणि संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातही 2014 साली वाद झाला. पुतण्याने काकाचा 21 हजार मतांनी पराभव केला. राज्याच्या राजकारणात ठाकरे, पवार, भोसले, निंगेकर, क्षीरसागर, मुंडे, तटकरे हे घराणे दबदबा निर्माण करून सोडणारे आहेत मात्र या मातब्बर घरांमध्ये मातब्बर काकांना वाचवा हो ची आरोळी द्यावयास पुतण्यांनी भाग पाडले.