मी भाजपाचीच, माझं करीअर संपवण्याचा डाव म्हणत पंकजा मुंडेंनी काल पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये सातत्याने मला सिद्ध का करावे लागत आहे. मी पक्षासाठी भरपूर काही केलं, पक्ष आदेशाला जी सरजी म्हणत तात्काळ स्वीकारलं. असे असताना मला अनेक वेळा डावलण्यात आलं. ठाकरेंची शिवसेना फुटली, पवारांची राष्ट्रवादी संपली, आता भाजपाचे ते हाल होऊ नयेत, असे वक्तव्ये करत आपण आत्मचिंतनासाठी दोन महिन्याच्या सुट्टीवर जात असल्याचे पंकजा मुंडेंनी सांगून पुन्हा एकदा राज्य भाजपाच्या नेतृत्वावर कटाक्ष टाकत केंद्रिय भाजपाला पक्षफुटीच्या धोक्याचे संकेत दिले.
पंकजा गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणामधले मोठे नाव. माध्यमांची टीआरपी वाढवणारे आणि सुपारीबाज माध्यमांच्या निशण्यावर असलेले एक टार्गेट. स्व. गोपीनाथराव मुंडेंचा वारसा तेवढ्याच ताकतीने सांभाळताना गेल्या दशकभराच्या कालखंडात पंकजा मुंडे यांनी घेतलेला ताठरतेचा स्वभाव हा जेवढा त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मारक ठरला तेवढीच त्यांची राजकीय महत्वाकांक्षाही त्यांच्या राजकीय विकासाला आड आली. स्व. मुंडेंच्या निधनानंतर ही वाघीन भाजपासाठी बाहेर पडली, राज्यभरात संघर्ष यात्रा काढली, त्याचं सकारात्मक फळही भाजपाला भेटलं, मात्र मुख्यमंत्रीपदाच्या महत्वकांक्षेने म्हणजेच जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्येच मोठे दुश्मन उभे केले. अशा स्थितीत गोपीनाथरावांची जादुची कांडी सातत्याने कामी यायची. मात्र ताठर आणि अहंकारी स्वभावामुळे पंकजा मुंडेंच्या हाती स्व. मुंडेंची जादुची कांडी चालली नाही आणि इथेच स्वपक्षीय विरोधकांना पंकजांविरोधात कटकारस्थान रचताना यश येत गेले.
या चार वर्षांच्या कालखंडात तर राज्य भाजपाच्या नेतृत्वाने पंकजा मुंडेंना अक्षरश: एका खड्यासारखे बाजुला ठेवले. हे ठेवत असताना पंकजा मुंडे सातत्याने आक्रमक होत गेल्या. नाराजी व्यक्त करत राहिल्या, मात्र त्या स्थितीतही केंद्रिय भाजपाने आज पावेत तरी पंकजांच्या नाराजीकडे लक्ष दिले नाही. म्हणून गेल्या दोन वर्षांच्या कालखंडामध्ये पंकजा मुंडे भाजप सोडणार, त्या अमुक पक्षात जाणार अथवा वेगवेगळ्या पक्षांकडून त्यांना आमंत्रित करण्यात येऊ लागले, अशा स्थितीतही पंकजा यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी आपण भाजपातच असल्याचे सांगून आपले नेते हे मोदी-शहा असल्याचे स्पष्ट केले. आपण त्यांची वेळ घेणार, सर्वस्थीती सांगणार त्यानंतर काय निर्णय घ्यायचा तर घेणार, असे वक्तव्ये केले होते.
या वक्तव्याला आज तीन ते चार महिने होऊन गेले आहेत. मात्र अद्यापपावेत पंकजा आणि मोदी-शहा यांची भेट झाल्याचे जाणवत नाही. उलट शहा महाराष्ट्रात एका कार्यक्रमासाठी येतात आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचे कौतुक करतात, यातून राज्य भाजपाबरोबर केंद्रीय भाजपही पंकजांच्या नाराजयुक्त वक्तव्याकडे दुर्लक्ष करतायत का? हा प्रश्न नक्कीच कोणालाही पडतो. गेल्या चार वर्षांच्या कालखंडामध्ये आपल्यावर कसा अन्याय होत गेला आणि आपण पक्षासाठी कसे काय काय करतो हे पंकजांनी काल स्पष्ट केले, मात्र पंकजांचा कालचा कटाक्ष जो राज्य भाजपाच्या नेतृत्वावर होता तो पाहितला. पक्षीय धोका अन् त्याबाबतचा संकेत दृष्टीक्षेपात घेतला तर पंकजा मुंडे या निर्णायक मोडवर आल्याचे दिसते. पंकजा मुंडेंनी काल स्पष्ट केले, मी दिनतयाळ यांच्या आणि वाजपेयींच्या भाजपाची कार्यकर्ता आहे. असेच जर होत राहिले तर भाजपही फुटू शकेल, पंकजांचे हे वक्तव्य राजकीयदृष्ट्या दखलपात्र आणि भाजपाच्या दृष्टीने ‘आता सावध सावधान’, असेच म्हणता येईल. पंकजांच्या या वक्तव्यावर आणि व्यक्त केलेल्या नाराजीवर महाराष्ट्र भाजपाचे नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना होय, राष्ट्रवादीचे लोक आपल्याकडे आले आहेत, त्या दोघांमध्ये टोकाचे वाद आहे, त्यामुळे आमच्यातल्या काही लोकांना या गोष्टी आवडत नसतील, चर्चेतून प्रश्न सुटतात, आम्ही यावर चर्चा करू. असे नेहमीचे उत्तर देऊन टाकले. परंतु पंकजा मुंडे या सातत्याने मलाच उत्तर का द्यावे लागतात? असा सवाल करत काही उत्तरे पक्षानेही द्यावेत, काही प्रश्नांवर पक्षानेही स्पष्टता द्यावी. असे म्हटल्याने आणि दोन महिन्यांच्या सुट्टीत आत्मचिंतित होऊन बोलणार असल्याचे सांगितल्याने हे कपातलं वादळ सह्याद्रीच्या कड्याकपारात कधी घोंगावेल आणि या वादळातून महाराष्ट्र भाजपाचे लक्तरे तर वेशीला टांगणार नाहीत ना? हा येणारा काळ सांगेलच.
परंतु दोन महिन्यांचा कालखंड आपण मोजला आणि पंकजांचा दसरा मेळावा लक्षात घेतला तर बहुदा पंकजा दसरा मेळाव्यातच आत्मचिंतीत झालेली पंकजा महाराष्ट्रासमोर मांडताना राज्य भाजपाच्या नेतृत्वाला आणि केंद्रिय भाजपाच्या श्रेष्ठीला पंजा तर दाखवणार नाही. असो, पंकजांच्या सातत्याच्या स्पष्टीकरणातून त्यांच्यावर पक्षात अन्याय होतोय, हे लक्षात येतं अन् पक्षाच्या दुर्लक्षातून आमच्याकडे लोकशाही नव्हे तर हुकुमशाही आहे, त्या हुकुमशाहीच्या संस्कारातच तुम्हाला काम करावे लागेल ही स्पष्टता पहावयास मिळत आहे. आता भाजपाचे हुकमातले पंकजांवर वरचढ ठरतात की लोकशाहीला मानण्याची करणारे पंकजाच्या पाठिशी किती उरतात हे येणारा काळ सांगेल.