गणेश सावंत
मो. नं. 9422742810
सत्तेसाठी हपापावे,
वाटेल तैसे पाप करावे,
जनशक्तीस पायी तुडवावे,
ऐसे चाले स्वार्थासाठी
संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगितातल्या या चार ओळी आज बरच काही सांगून जातायेत. जिथं स्वार्थ येतो तिथं सत्तेची नितांत गरज असते. तोच स्वार्थ साधण्यासाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जी रणनीती आखत आहे त्या रणनीतीमध्ये जनशक्ती अधिक अधिक प्रमाणात पायी कशी तुडवली जाईल याकडे अधिक लक्ष देत आहे. हे लक्ष देतांना पक्षा पक्षांमध्ये ‘परि घुसविले गावचे भेदी, लावीली स्वार्थासाठी उपाधी, उगी दुगी करूनी भ्रमली बुद्धी, पाडली फूट, सेवेचे सोंग उभे केले, स्तुती पाठक घुसविली, वाईट झाले तेथे माथी मारले खर्या सेवकांच्या’ तुकडोजींच्या या ग्रामगितेतील काव्यांचा अधिक उपयोग करून घेतल्याचे दिसून येते. भाजप यापुढे जात ‘नथेतून जैसा मारावा तीर तैसे असती बहादूर’ जात पात, धर्म-पंथाच्या राजकारणापाठोपाठ फोडाफोडीच्या राजकारणासाठी भाजप नथीतून तीर मारतो आणि फुटीरवाद्यांना बहादूर समजतो. मात्र हे राजकारण सर्वसामान्यांच्या कामाचे आहे का? लोकहिताचे आहे का? समाजहित यातून जोपासले जाणार आहे का? विश्वासार्हतेची ही हत्या नव्हे का? निष्ठेला आजच्या राज्यकर्त्यांकडे अथवा राजकारण्यांकडे महत्वच नाही का? असे एक ना अनेक प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीत.
महाराष्ट्राचं राजकारण
आज पाहितलं तर राज्यात किती पक्ष आहेत, कोण कुठल्या पक्षात आहे? हे सांगणे कठीण होऊन बसले आहे. गेल्या चार वर्षांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात जी अस्थिरता पहायला मिळते ती आजपावेत कुठेच पहायला मिळाली नसावी. एक नव्हे, दोन नव्हे तीन-तीन वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ महाराष्ट्रात घेतली गेली. चार प्रमुख पक्ष असले तरी कोण कोणाच्या गळ्यामध्ये गळे घालतय आणि कोण कोणाच्या पायामध्ये पाय घालतय, हे समजायला मार्ग नाही. राजकीय सौराचार कशाला म्हणायचे, सौराचार्य व्यक्ती कोण? असा जर प्रश्न जगाच्या पाठीवर कोणी जर विचारला तर सौराचाराची व्याख्या, हे महाराष्ट्राचे राजकारण अशी असेल आणि सौराचार्य व्यक्तीची व्याख्या ही महाराष्ट्राचे पुढारी असतील. गेल्या चार वर्षांच्या कालखंडामध्ये सत्ताकारणासाठी भाजपाने जे जे नास्तिकपणाचे करता येईल ते ते करून अस्तिकपणाचा आव जो आणला आहे तो महाराष्ट्राच्या भल्यासाठी नक्कीच नव्हे. महाराष्ट्राचा विकास डोळ्यांसमोर ठेवून आम्ही पुढे जात असल्याचा दावा भारतीय जनता पार्टीकडून केला जातोय आणि त्या विकासासाठी आम्ही अन्य पक्षातल्या असंतुष्टांना सोबत घेत आहोत, असे संबोधून
‘गर्जा महाराष्ट्र’
चा निनाद नव्हे तर पिपाणी वाजविली जात आहे. वर्षानुवर्षे सोबत असलेल्या शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावरून 2019 च्या निवडणुकीत भाजपाशी फारकत घेतली आणि इथेच सत्तालालसी असलेल्या दिल्ली तक्ताला महाराष्ट्राची चीड तर आलीच परंतु शिवसेनेबाबत घृणा निर्माण होत शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना अद्दल घडविण्याहेतू वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जी फूट पाडली ती उभ्या महाराष्ट्राने पाहिली. एकनाथ शिंदेंच्या मते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आपले राजकीय दुश्मन समजले त्याच दोन पक्षांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बाळासाहेबांचे कट्टर सैनिक बसूच शकत नाहीत, त्यामुळे आम्ही शिवसेना सोडल्याचे शिंदे गटाने म्हटले. राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या दादागिगरीमुळे त्यांच्या अर्थखात्याकडून शिवसेनेच्या आमदाराला फंडींग मिळत नसल्याचे कारण पुढे करत आम्ही शिवसेना सोडल्याचे म्हटले. भाजपाने एक वर्ष शिंदे गटासोबत सुखाचा संसार केला, मात्र पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात दिल्लीश्वरांच्या आशीर्वादाने देवेंद्र फडणवीसांनी धरणीकंप केला अन् राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. जे अजित पवार गेल्या कित्येक वर्षांपासून पक्षाच्या एकसुत्री नेतृत्वासाठी धडपडत होते त्या अजित पवारांना मोहरा करत भाजपाने संधी साधली आणि अजित पवारांसह राष्ट्रवादीचे चाळीस आमदार आपल्या खेम्यात आणले. महाराष्ट्रामध्ये दबदबा असणारे दोन पक्ष भारतीय जनता पार्टीने फोडले, ते भाजपाच्या चाणक्यांसाठी पाठ थोपटून घेण्याचा भाग असला तरी निवडणुकांसह अन्य राजकारण, समाजकारण, सेवाकारण यांच्यामध्ये काम करणार्या
त्या कार्यकर्त्यांचं काय?
मग ते भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असोत अथवा या चारही पक्षांना फॉलो करणारी सर्वसामान्यांची विचाधारा, त्या विचारधारेचे काय? सत्तालंपटपणा जोधहून विचारांची पायमल्ली करत ‘संग’ करणे आणि त्या संगातून निर्माण झालेल्या गर्भाला नाव न मिळणे असेच काहीसे राजकारण सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. फोडाफोडीच्या राजकारणामध्ये सत्ताकारणाचे गणित जुळत असले तरी विचारांचे गणित जुळणार आहेत का? भाजपाच्या कार्यकर्त्यांनाच आजची राजकीय खेळी ही फळवण्यासारखी आहे. माजावर असलेल्या एखाद्या जनावरावर वर तंगड्या करणे हे जर राजकारण असेल तर अशा राजकारणातील भविष्याच्या पिढीला सत्य-निष्ठा-कर्म आणि धर्म याचे खरे शिक्षण मिळणार आहे का? तर याचे उत्तर नाही असेच असेल. वाजपेयींची भाजपा ही वैचारिक विचारधारेवर चालणारी होती. म्हणूनच आजचे पंतप्रधान आणि तेव्हाचे गुजरातचे नरेंद्र मोदी शेजारी बसलेले असताना जाहीर पत्रकारांसमोर अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘राजधर्म’ पाळण्याबाबत वक्तव्य केले होते. 20-25 वर्षांपूर्वी केलेले हे वक्तव्य आणि त्यानंतर मोदींचा उधळलेला राजकीय वळू पाहितला तर राजधर्माचे पालन होतेय का? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाला माहित असेल. मात्र आता महाराष्ट्राच्या विकासाचा डांगोरा पिटवून महाराष्ट्रात जो राजकीय व्याभिचार चालू आहे तो महाराष्ट्राच्या विकासासाठीच म्हणायचा का? तर नाही. 2024 च्या
लोकसभा निवडणूक
अनुषंगाने केली जात असलेली ही एक खेळी आहे. गेल्या नऊ-साडेनऊ वर्षांच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीने देशवासियांना जे काही स्वप्न दाखवले, जे काही आश्वासने दिली ते पुर्णत्वास नेण्यात ते अपयशी ठरले. नोकर्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारीचा प्रश्न असेल, महागाईचा आणि देशपातळीवर युवकांच्या महत्वकांक्षेचा प्रश्न, हा प्रश्नच राहिला. आश्वासने देणे हे निवडणूक काळातले जुमलेबाज म्हणणे असते, असे भाजपाचे चाणक्य अमित शहा यांनी आधिच स्पष्ट केले आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रातल्या फोडाफोडीच्या राजकारणाला ते जर विकासाचे नाव देत असतील तर ती गफलत असेल. येणार्या 2024 च्या निवडणुकांमध्ये देशातली जनता आपल्या पाठीशी उभ राहिलच हे सांगणे भाजपासाठी कठीण होऊन बसले आहे म्हणून भाजपाने फोडाफोडीच्या राजकारणात अन्य पक्षातून फुटलेल्या नेत्यांच्या बळावर आपले जास्तीत जास्त खासदार निवडून आणणे एवढेच ध्येयक्रम सध्या भाजपाचे आहे. त्या हेतुनेच महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण केले जातेय. शिवसेनेतला शिंदे गट आणि राष्ट्रवादीतला दादा गट यांच्याकडे जे काही राज्यभरातले मातब्बर नेते गेले आहेत त्यांच्या पाठीशी नक्कीच समाज आहे, मात्र त्या नेत्यांनी केलेला मतदारांचा विश्वासघात समाजाला रुजेल की नाही ? हा येणारा काळ सांगेल. परंतु देशात आणि राज्यात सुरू असलेले फोडाफोडीचे राजकारण हे त्या त्या राज्याच्या विकासासाठी नव्हे तर 2024 मध्ये सत्तेच्या लोण्याचा गोळा आपल्याच पत्तरवाळीवर असावा, यासाठी भाजपाने केलेला हा खटाटोप आहे. हे देशातल्या आणि राज्यातल्या जनतेने चांगल्या पद्धतीने ओळखले आहे. अशा
स्थितीत गावागावात
मतामतांचा हलकल्लोळ
उडण्याची अधिक शक्यता आहे. त्यासाठी कोण गावचा पुढारी ठरवावा, आधी मान कोणास द्यावा, कोणाच्या हाती चालवावा कारभार गाव सेवकाचा म्हणुनी निवडणूक ठरविली, ती जणू आगीत बारुद पडलीय, अथवा रॉकेलाची टाकीच ओतली अग्नि माझी’, तेने जहाला अग्निबंबाळ, मता-मतांचा हल्लाकल्लोळ’, तुकडोजींनी तेव्हाच लिहून ठेवलय, अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा गावागावांमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वांनाच नेतृत्वाची संधी देण्याचे आमिष दाखविले जातात, एकमेकांना एकमेकांसमोर केले जाते आणि निवडणुकीच्या माध्यमातून वाद निर्माण करत वैचारिक अग्निबंबाळ तर केला जातो, आताही तेच होईल, गेल्या नऊ वर्षांच्या कालखंडामध्ये भाजपाने जात आणि धर्माच्या नावावर अनेक निवडणुकांत विजय प्राप्त केला. आता तो मुद्दा बोथट होण्याच्या भीतीने राज्याराज्यात फुटीरतेचे बीज पेरले जात आहेत. हा राज्याचा अथवा गावाच्या विकासाचा मुद्दा नाही तर एकमेकांना गुद्द्यावर ठेवून लोकसभेचा मलिदा खाण्याहेतू केलेला खटाटोप आहे.