14 जणाविरोधात पोस्को कायद्यानुसार गुन्हे दाखल
अत्याचार पिडीत मुलगी बालकल्याण समितीकडे सुपूर्द
महिला आयोगाकडे करण्यात आली हाती तक्रार
बीड (रिपोर्टर)ः-नववी वर्गात शिकणार्या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सतत अत्याचार करण्यात आला होता. यातून पिडीता गर्भवती राहीली. या प्रकरणाची तक्रार महिला आयोगाकडे करण्यात आली होती. पिडीतेचा अनाधिकृतपणे आणि जबरदस्तीने औरंगाबाद याठिकाणी गर्भपात करण्यात आला. काल पिडीतेने बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानूसार अत्याचार करणार्या तरुणासह अनाधिकृतपणे गर्भपात करणार्या आणि गर्भपात करण्यासाठी मदत करणार्या अशा 14 जणांविरोधात बीड ग्रामीण पोलीसात पोस्को कायद्यानूसार गंभीर स्वरुपाचे गून्हे दाखल करण्यात आले. पिडीतेला पोलीसांनी बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले आहे.
बीड पासून काही अंतरावर असलेल्या खापर पांगरी येथील एका 14 वर्षीय मुलीवर गावातीलच रंजीत शेंडगे याने सततपणे अत्याचार केला. या अत्याचारातून मुलगी गर्भवती राहीली. जिल्हा रुग्णालयामध्ये मुलीची तपासणी केली असता. तिच्या पोटात सात महिन्यांचा गर्भ असल्याचे समोर आले. बीडमध्ये गर्भपात होत नसल्याचे पाहून तिला अंबाजोगाई आणि गेवराईच्या रुग्णालयामध्ये नेण्यात आले होते. त्याठिकाणीही तिचा गर्भपात झाला नाही. मात्र औरंगाबाद याठिकाणी तिचा अनाधिकृतपणे गर्भपात करण्यात आला. गर्भपात एका पत्र्याच्या शेडमध्ये झाला. गर्भपातानंतर पिडीतेचं मुलं मृत अवस्थेत जन्माला आले असल्याचे सांगण्यात आले. गर्भपात 24-06-2023 रोजी करण्यात आला. गर्भपात करण्यासाठी पवन शेंडगे, जालींदर खामकर, योगेश शेंडगे यांच्यासह आदिंनी मदत केली. पीडीतेचा अनाधिकृतपणे आणि जबदरस्तीने गर्भपात करण्यात आला. काल पिडीतेसह तिचे आई वडील पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेले होते. पोलिस अधीक्षकांच्या निर्देशानूसार बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात पिडीतेने संबधीतांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार अत्याचार करणारा रंजीत शेंडगे याच्यासह अनाधिकृतपणे गर्भपात करणारे व त्यासाठी मदत करणार्या पवन शेंडगे, जालींदर खामकर, योगेश शेंडगे यांच्यासह अन्य अशा 14 जणाविरोधात कलम 376(2),376(2)(एन), 376(3), 376(2आय), 313, 315, 316, 318, 34,4, 6, 8, 12, या कायद्यानूसार गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहे. दरम्यान हे प्रकरण महिला आयोगाकडे गेले होते. अत्याचार पिडीतेच्या नातेवाईकाने महिला आयोगाकडे पत्राद्वारे तक्रार केली होती, तेव्हा पासून या प्रकरणाची चर्चा सुरु होती. बालकल्याण समिती पीडीतेसह तिच्या आई वडीलांचा शोध घेत होती. गेल्या पंधरा दिवासापासून पिडीतेसह तिचे आई-वडील अज्ञात स्थळी होते. पिडीता सध्या बालकल्याण समितीकडे आहे.
अवैध गर्भपाताचे सेंटर पुन्हा सुरू ?
गेल्या वर्षभरापूर्वी बीडमध्ये अवैध गर्भपाताच्या प्रकरणाने अवघ्या राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. बीडमध्ये झालेल्या गर्भपाताचे कनेक्शन थेट औरंगाबादपर्यंत उघडकीस आले होते. आता पुन्हा अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारातून ती मुलगी गर्भवती राहिली आणि तो गर्भ एका पत्र्याच्या शेडमध्ये औरंगाबादेत काढण्यात आला. त्यामुळे अवैध गर्भपाताचे सेंटर पुन्हा बीड, औरंगाबाद परिसरात सुरू झाल्याचे दिसून येते.
जिल्हा रुग्णालय, अंबाजोगाई आणि गेवराई रुग्णालयाने पोलीसांना माहिती का दिली नाही
पिडीतेला प्रथम तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. त्याठिकाणी तिची सोनोग्राफी करण्यात आली होती. त्यातून ती गर्भवती असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पिडीतेच्या आई वडीलांनी तिला अंबाजोगाई आणि गेवराईच्या रुग्णालयात नेले होते. तेथील डॉक्टरांनी गर्भपात करण्यास नकार दिला. या तिन्ही रुग्णालयातील डॉक्टरांनी याची माहिती संबधीत ठाण्याच्या पोलीसांना किंवा जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिली असती तर वेळीच हे प्रकरण दाखल झाले असते. वैद्यकीय अधिकार्यांनी जागृकता दाखवली नसल्याने त्यांच्यावरही हे प्रकरण शेकू सकते. सदरील पिडीतेच्या पोटी जे बाळ जन्माला आले ते मृत जन्मले. अनाधिकृतपणे गर्भपात केल्याने पिडीतेच्या जिवाला धोकाही होवू शकला असता.
अनाधिकृतपणे गर्भपात केलेले ते औरंगाबादचे शेड कोणाचे?
पिडीतेचा गर्भपात करण्यासाठी तिला औरंगाबाद याठिकाणी नेण्यात आले. तेथील एका अज्ञात स्थळी शेडमध्ये तिचा गर्भपात करण्यात आला. सदरील हा गर्भपात कोणी केला, यामध्ये काही वैद्यकीय अधिकार्यांचा सहभाग आहे की, खाजगी लोकांची टोळी अशा पध्दतीने अनाधिकृतपणे गर्भपात करत आहे, याचाही तपास होणे गरजेचे आहे.