फडकरी व देशमुख यांच्यावर गुन्हे दाखल, पोलीसांच्या भूमीकेकडे सर्वांचे लक्ष
बीड (रिपोर्टर)ः- परळीतील शेकडो लोकांच्या तक्रारीवरुन सहाय्यक निंबधक, परळी वैजनाथ यांनी दि. 29.05.2023 रोजी एकाच वेळी भिमाशंकर उर्फ जिवन फडकरी रा.माधव बाग यांच्या घरी, तसेच महादेवअप्पा फडकरी पतसंस्थेवर परळी व पृथ्वीराज उर्फ बबलू रघूनाथ देशमुख रा.वरद पार्क वाघाळा रोड, अंबाजोगाई यांच्या घरावर धाड टाकली असता अनेक कोरे सही केलेले चेक्स, अनेक कोरे सही केलेले बॉन्ड, अनेक रशिद लावून सही केलेले कोरे पेपर्स, शेतीच्या सात बारा, शेतीचे 8 अ उतारा, मालमत्तेचे खरेदीखते, सापडली असून यानूसार सहाय्यक निबंधक, परळी वैजनाथ यांनी या दोघांवर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनीयम 2014 मधील कलम 39 नूसार अवैध सावकारीचे गुन्हे दि. 11.07.2023 रोजी संभाजीनगर पोलीस स्टेशन परळी (एफ.आय.आर.नं. 130), व दि. 12.07.2023 रोजी शहर पोलीस स्टेशन, अंबाजोगाई (एफआयआर नं. 266), येथे दाखल केलेले आहे.
भिमाशंकर उर्फ जीवन महादेवअप्पा फडकरी हे डॉ.शिवकांत आंदुरे मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी असून पतसंस्थेच्या माध्यमातून खाजगी अवै. सावकारी व अवैध बी.सी. चालवून अनेक लोकांना फसवण्याचे कामे करतात. यातूनच यांनी करोडो रुपयांची संपत्ती बळकवल्याचे आरोप आहेत. तसेच कोरे चेक घेवून त्यावर अव्वाच्या -सव्वा रक्कम टाकून सदरील चेक बाउंस करुन त्यांनी परळीतील कोर्टात अनेक लोकांवर खोटया केसेस केलेल्या आहेत.
महादेव अप्पा फडकरी पतसंस्था ही केवळ नावालाच पतसंस्था असून त्यातून अवैध खाजगी सावकाराकी चालते. स्वतःच्या अवैध खाजगी सावकाराकी करण्यासाठी पतसंस्थेच्या कार्यक्षेत्रा बाहेर कर्ज वाटप करणे तसेच कर्ज मर्यादेपेक्षा अनेक पट अधिक कर्ज देवून स्वतःच्या अवैध खाजगी सावकारकीची वसूली केली जाते.पृथ्वीराज उर्फ बबलू रघुनाथ देशमुख रा.सोमेश्वर नगर, परळी वै.ह.मु. वरद पार्क वाघाळा रोड अंबाजोगाई हे तोरल फायनान्सचे संचालक असून हे लोकांचे कोरे सही केलेेले चेक्स व कोरे सही केलेले बॉडस तसेच काही लोकांचे तर मालमत्तेचे खरेदीखत देखील करुन घेतलेले दिसून येते . देशमुख हे नगर पालिकेला हाताशी धरुन अनेक लोकांच्या परस्पर तोरल फायनान्सचा बोजा चढवतात. खोट्या कोर्ट केसेस करणे, गुंडा मार्फत धमकावणे, गुंडामार्फत मारहाण करणे असे प्रकार केले जातात.
या गुन्ह्यातील परळीतील तपास हा सौदणकर व अंबाजोगाई येथील बोडखे हे करत आहेत.