पाठलाग करून पोलिसांनी अपहरणकर्त्याच्या मुसक्या
बांधल्या पिस्टलसह धारदरा शस्त्र जप्त, तरुणाची सुटका
माजलगाव/बीड (रिपोर्टर): गुंतवणुकीसाठी दिलेले पैसे परत घेऊन जा, असं म्हणत फिर्यादीला चहा पिण्यासाठी बोलावून त्याला चारचाकी गाडीत टाकून अपहरण केले. याची माहिती पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी आणि पाठलाग करत अपहरणकर्त्याच्या गढी-माजलगाव रोडवर मुसक्या बांधल्या. अपहरण झालेल्या तरुणाला सुखरुपपणे पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले. या वेळी अपहरणकर्त्याकडे एक पिस्टल व अन्य धारदार शस्त्र मिळून आले. सदरचा थरार हा काल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास माजलगाव-गढी रोडवर पहावयास मिळाला. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक असे की, परमेश्वर वैजनाथ लेवडे (वय 23 वर्षे, रा. शाहुनगर माजलगाव शहर) या युवकाचे शहरामध्ये फुटवेअरचे दुकान आहे. मागील एक वर्षापूर्वी वैजनाथ लेवडे यांनी रमेश बालासाहेब वारे (रा. कोथरूळ (एजंट) यांचेकडे विस लाख रूपये गणेश राजाराम भिसे (रा. अंबाजोगाई) याचे जीआरबी कंपनीमध्ये गुंतवणुक करणेसाठी दिले होते. सदर रक्कमेचा परतावा दोन लाख दहा हजार परत देण्यात आला व त्यानंतर सदरची बाकी रक्कम व त्याचा वाढीव परतावा दिलेला नाही. त्याच्या बदल्यात गणेश भिसे याने त्याच्या एचडीएफसी बँकेचा चेक वडीलांना दिला होता. सदर चेक बँकेत वटविण्यासाठी दिला असता भिसे याच्या खात्यामध्ये पैसे नसल्याने तो वटला नाही म्हणुन त्या चेकच्या अधारे मागील चार महिण्यांपूर्वी येथील कोर्टात गणेश भिसे, रमेश वारे, पुजा भिसे व प्रिती भिसे यांचे विरूध्द केस दाखल केली आहे. काल दि. 14 जुलै रोजी गणेश राजाराम भिसे याने लेवडे याला फोन करुन पैशाबद्दल बोलू बायपास रोडला ये म्हणाला होता. लेवडे हा त्याचा मित्र सुनिल बब्रुवान फपाळ (रा. बेलुरा) याला घेवून तेथे गेलो असता लेवडे याला विना नंबरच्या सफारी गाडीमध्ये बसवुन पुढे चहा घेवू म्हणत गढी रोडने वेगाने गाडी पळवली गाडीतील दोघांनी लेवडे याला लाथा, बुक्याने मारहाण केली. गणेश भिसे याने तुला आता जिवे मारून टाकण्यासाठी घेउन जात आहे असेत तुझ्या भावाचे पण हातपाय तोडणार आहोत असे म्हणून धमकी दिली. त्यांनतर लेवडे याचा मित्र सुनिल फपाळ याने डायल 112 वर पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी सतर्कता दाखवत गेवराई पोलिसांना व महामार्ग पोलिसांना सतर्क केले. महामार्ग पोलिस पो.शी. कृष्णा बाबासाहेब जाधव, आणि पो.शि. दासू गोरक्षनाथ भोकरे यांनी जिवाची बाजी लावून तब्बल 20 ते 25 कि.मी पाटलाग करुन लेवडे याची सुटका केली. याप्रकरणी परमेश्वर वैजनाथ लेवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश राजाराम भिसे रा. अंबाजोगाई, हनुमंत त्रिंबक झोडगे रा. भिमनगर परळी वै.,श्रीनिवास अशोक चव्हाण रा. जवळगाव ता. अंबाजोगाई, रविंद्र राजेभा आव्हाड रा. वडसावित्रीनगर परळी वै. यांचेविरूध्द माजलगाव शहर पोलिसात कलम 364, 323, 506, 36 अन्वये अपहरण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश इधाते हे करत आहेत.
दोन पोलिस कर्मचार्यांनी दाखवले धाडस
अपहरण कर्तांनकडे सफारी चारचाकी गाडी होती. ती ताशी 160 ते 170 च्या स्पिडने धावत होती. महामार्ग पोलिस पो.शी. कृष्णा बाबासाहेब जाधव, आणि पो.शि. दासू गोरक्षनाथ भोकरे यांनी पोलिस वाहनातून त्यांचा पाठलाग केला. गडी रोडवर वाहतूक कोंडीमुळे पोलिसांनी त्यांना पकडण्यात यश आले. मात्र अपहरण कर्त्यांनकडे पिस्टल अन् ते चौघे जण होते तरी देखील पोलिस कर्मचार्यांनी धाडस दाखवत मोठ्या शिताफीने त्यांच्याकडील पिस्टल चौघांना ताब्यात घेतले. त्यानंतर जास्तीचा बंदोबस्त मागावून आरोपींना गेवराई पोलिस ठाण्यात नेले.