भेटीकडे महाराष्ट्राचे लक्ष; तर्कवितर्कांसह चर्चेला उधान
मुंबई (रिपोर्टर): शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीतील नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे दिसून आले. दोन दिवसांपूर्वी या मंत्र्यांना खातेवाटपही करण्यात आले. एकीकडे उद्यापासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना आज दुपारी एक वाजता उपमुख्यमंत्री अजित पवारांसह त्यांच्या गटातील मंत्री शरद पवार यांच्या भेटीसाठी वायबी सेंटरमध्ये डेरेदाखल झाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कासह चर्चांना उधान आले आहे. ही भेट नेमकी कशासाठी आहे? अद्याप समजू शकले नसले तरी विरोधी पक्षाच्या बैठकीतून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनाही तत्काळ वायबी सेंटरला बोलावण्यात आले आहे.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार गट असे काहीसे चित्र उभा महाराष्ट्र गेल्या पंधरा दिवसांपासून पहात आहे. दोन्ही नेत्यांनी आपआपली ताकद दाखवून सभाही घेतल्या आहेत. एकमेकांवर आरोपही करण्यात आले आहेत. अशा स्थितीत उद्या विधिंमडळाचे अधिवेशन सुरू होत असताना आज आदल्यादिवशी अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रिफ यांच्यासह महत्वाचे नेते हे यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवारांच्या भेटीसाठी पोहचले आहेत. दुपारी एक वाजता हे सर्वजण वायबी सेंटरवर पोहचले आहेत, तत्पूर्वी खा. सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना तत्काळ वायबी सेंटरला बोलावून घेतले. हे दोघे विरोधी पक्षांच्या बैठकीत होते. अजित पवार गट हा शरद पवारांच्या भेटीला का गेला? नेमके तेथे काय चालू आहे? हे अद्याप महाराष्ट्राला माहित नसले तरी या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांसह चर्चा सुरू झाल्या आहेत.