दहा जणांचा मृत्यु, 60 पेक्षा अधिक जण ढिगार्याखाली;
75 जणांना सुखरुप काढण्यात यश; घटनास्थळावर मुख्यमंत्र्यासह विरोधी पक्षनेते दाखल
रायगड(रिपोर्टर)ः- कोकणामध्ये पावसाने हाहाकार उडवून सोडला आहे. जोरदार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर डोंगर कोसळ्याने तिस घरे डोंगराखाली आडकून पडले असून या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचे मृतदेह ढिगार्याबाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. अद्याप 60 पेक्षा अधिक जण ढिगार्याखाली दबल्याची भिती व्यक्त केली जात आहे. 75 पेक्षा अधिक जणांना एनडीआरएफच्या पथकाने सुरक्षीतपणे बाहेर काढले आहे. घटनेची माहिती कळताच मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते अन्य नेते घटनास्थळावर पाहणी करण्यासाठी गेले आहे.
इर्शाळगडाच्या पायथ्याशी इर्शाळवाडी आहे. 70 ते 80 घरे असलेल्या इर्शाळवाडीवर रात्री 10.30 ते 11 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळले. दरडेखाली तब्बल तिस घरे बुजली गेली. रात्रीच्या दरम्यान सदरची दुर्घटना घडल्याने अनेक जण घरामध्ये झोपलेले होते. घटनेची माहिती प्रशासनाला झाल्यानंतर घटनास्थळावर मदत कार्य करणार्या पथकाना पाचारण करण्यात आले. वातावरण खराब असल्याने आणि संततधार पाऊस सुरू असल्याने मदत करणार्यांना अनेक अडचणी येत होत्या. अशा स्थितीतही एनडीआरएफ च्या पथकाने 75 जणांना ढिगार्या खालून बाहेर काढले. तर दहा जणांचे मृतदेह बचाव कार्य करणार्यांच्या हाती लागले असून आणखी 60 पेक्षा अधिक जण ढिगार्या खाली अडकून पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. इर्शाळवाडी ही उंचावर असून त्याठिकाणी पायी जावे लागते. धुवाधार पाऊस, वातावरण खराबीमुळे हॅलीकॉप्टरही दुपारपर्यंत घटनास्थळावर जावू शकले नाही. मदत कार्याला प्रशासनाकडून वेग देण्यात आला असून घटनास्थळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उदय सांमत, दादासाहेब भुसे यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.
मृतमुखी पडलेल्या गावकर्यांच्या कुटूबीयांना राज्य शासनाने पाच लाखाची मदत घोषीत केली आहे. मदत कार्य सुरू असून सदरची घटना अत्यंत दुर्देवी असल्याचा अनेकांच्या प्रतिक्रिया आहे.