भाजपला 6, शिवसेना आणि
राष्ट्रवादीला प्रत्येकी 3 जागा
मुंबई (रिपोर्टर): राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. भाजपच्या वाट्याला 6, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 3 आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागा असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अधिवेशनानंतर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर राज्यपालांना यादी पाठवली जाणार आहे, असंही सूत्रांनी सांगितलं आहे.
राज्यात ठाकरे सरकार असताना राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात शेवटपर्यंत माजी राज्यपाल भगत सिंह कोशारी यांनी ठाकरे सरकारने दिलेली नावे मंजूर केली नव्हती. यावरुन राजकारणही रंगले होते. उद्धव ठाकरेच नाहीत तर खुद्द शरद पवार यांनी देखील भगत सिंह कोशयारी यांच्यावर जोरदार टीका केली होती. याच दरम्यान राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयात गेली. मात्र आता नियुक्तीची स्थगिती सुप्रीम कोर्टाने उठवल्याने आता राज्यपाल नियुक्त आमदार होण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.