बीड (रिपोर्टर): बीड जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणार्या 11 मुलांची लेखी परिक्षेद्वारे निवड करून अगोदर तामिळनाडु येथील इसरोला भेट दिल्यानंतर अमेरिकेतील नासा सेंटरला 11 सप्टेंबरला भेट देणार आहेत. या मुलांसोबत एका वैद्यकीय अधिकार्यासह पाच अधिकार्यांची टीम तैनात राहणार आहे.
जिल्हा परिषदेच्या मुलांचा वैज्ञानिक दृष्टीकोन वृद्धिंगत व्हावा आणि पारंपारिक डॉक्टर, इंजिनिअरपेक्षा मुलांनी वेगळ्या क्षेत्रात करिअर नर्माण करावे, या हेतुने सातत्याने गेल्या एक वर्षभरापासून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पाचवी ते आठवीपर्यंत शिकणार्या मुलांची स्पर्धा परीक्षा घेऊन अगोदर 34 मुलांची निवड केली. ही मुले तामिळनाडु येथील इसरो सेंटरला भेट दिल्यानंतर त्यातीलच मुलांची द्वितीय परीक्षा घेऊन प्रत्येक तालुक्यातून एका मुलाची अशी अकरा तालुक्यातून अकरा मुलांची निवड जिल्हा परिषदेने केली आहे. या मुलांचा पासपोर्ट आणि व्हिसा 30 तारखेला बीड जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्यानंतर ही मुले 8 सप्टेंबरला अमेरिकेतील नासा सेंटरला भेट देण्यासाठी विमानाद्वारे आकाशात झेपावणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेने 75 लाख रुपये खर्च केलेले आहेत. निश्चितच या अकरा मुलांतून काही मुले पेस इंजिनिअर होतील, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. अधिकार्यांच्या पाच टीममध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके आणि शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांचा समावेश आहे. प्रवासामध्ये विद्यार्थ्यांची वैद्यकीय काळजीसाठी वैद्यकीय अधिकारी वासंती चव्हाण यांचाही समावेश आहे.