मुंबई (रिपोर्टर): आमचा पक्ष, परिवार व्यवस्थित कसा ठेवायचा याची काळजी आम्ही घेऊ, असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच, जयंत पाटील आमच्यासोबत येतील की नाही? हे तेच सांगतील. मात्र, त्यांची आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झालेली नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले.
आमदारांवर दबाव नाही
अजित पवार यांनी आज पुण्यात साखर आयुक्तांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, अजितदादा गटास सामील व्हावे यासाठी शरद पवारांसोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांवर दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले, या चर्चा चुकीच्या आहेत. राष्ट्रवादीच्या कोणत्याही आमदारावर कशाचाही दबाव नाही. आमचा पक्ष, परिवार कसा व्यवस्थित ठेवायचा, याची काळजी आम्ही घेऊ. इतरांनी त्याबाबत काळजी करण्याची आवश्यकता नाही.दरम्यान, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमित शहांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. स्वत: जयंत पाटील यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. यावरही अजित पवार यांनी भाष्य केले. अजित पवार म्हणाले, जयंत पाटील हे अमित शहांना भेटलेलेच नाही. काहीही आधार नसताना बिनबुडाच्या बातम्या चालवल्या जात आहेत. या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही.जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडून भाजपसोबत किंवा अजितदादा गटासोबत येणार का? यावर अजित पवार म्हणाले, जयंत पाटील कुठे जातील? हे जयंत पाटीलच सांगू शकतील. त्यांच्या मनातील ओळखायला मी काही मनकवडा नाही. तसेच, अमित शहांनी माझी स्तुती केली तर तुमच्या पोटात काय दुखले? असा मिश्किल सवालही अजित पवारांनी माध्यम प्रतिनिधींना केला.दरम्यान, मी मुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा असेल, तर ती पूर्ण होवो, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. पटोले यांच्या या विधानामुळे त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यावर नानांना माझ्या शुभेच्छा आहेत, असा टोला अजित पवारांनी लगावला.