मुंबई (रिपोर्टर): लोकसभेनंतर दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले. सत्ताधार्यांच्या विजयामुळे आम आदमी पक्ष तसेच विरोधकांना मोठा धक्का बसला. यासंदर्भात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून कुठलाही व्हिप काढण्यात आला नव्हता. तसेच शरद पवार या विधेयकाला विरोध करण्यासाठी सभागृहात हजर होते. पण प्रफुल्ल पटेल यांनी दांडी मारली. यानंतर शरद पवारांनी दिल्लीत पदाधिकार्यांसोबत बोलताना भूमिका स्पष्ट केली, असे सांगितले जात आहे.
अजित पवार यांनी काही आमदारांसह बंड केल्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुतांश आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला. तर, शरद पवार यांचा गट विरोधी पक्षात आहे. शरद पवार गटातील आमदारांची संख्या कमी असल्याने त्यांना विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला सोडाव लागले. शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी अजित पवार यांच्या गटाकडून प्रयत्न सुरू आहे. शरद पवार हे भाजपला पाठिंबा देणार की, विरोधातच राहणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशातच शरद पवार यांनी दिल्लीत पदाधिकार्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत भूमिका स्पष्टपणे मांडली, अशी माहिती देण्यात आली आहे.