संगणक, एलसीडीसह अन्य उपकरणे धूळखात पडून; 772 शाळांना वीज कनेक्शन नाही तर 620 शाळांचे थकित बिलापोटी वीज कनेकशन कट
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण विभागाने डिजिटल लॅब, संगणक, एलसीडी यावर हजारो रुपयांचा खर्च केला आहे. विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावं यासाठी या सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या असल्या तरी तब्बल 772 शाळांना वीज कनेक्शन उपलब्ध नसल्याचे उघडकीस आले असून तब्बल 620 शाळांचे वीज कनेक्शन थकित वीज बिलापोटी कट करण्यात आल्याने या शाळांमध्ये अंधार पसरला आहे. शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार यातून स्पष्ट दिसून येत आहे. शिक्षण विभाग मात्र निधी नसल्याचे कारण पुढे करत ‘अंधेरा कायम रहे’ चा जयघोष करत आहे.
याबाबत अधिक असे की, बीड जिल्ह्यामध्ये 2480 जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. या सर्व शाळांना संगणके देण्यात आलेले आहेत. एलसीडी प्रोजेक्टर, स्मार्ट टि.व्ही., डिजिटल बोर्ड यासारखे विद्युतवर चालणारे उपकरणे देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावे यासाठी विज्ञान युगातली माहिती व तंत्रज्ञानाचे साहित्य उपलब्ध आहे मात्र विजेअभावी हे सर्व धूळखात पडून आहे. 772 शाळांना अद्यापपर्यंत वीज कनेक्शनच देण्यात आलेले नाही. तर 620 शाळांमध्ये थकित वीज बिलामुळे वीज कनेक्शन कट करण्यात आले आहे. एकीकडे डिजिटल शाळा आणि ई-लर्निंगच्या गप्पा मारणार्या शिक्षण विभागाचा गलथान कारभार यामुळे चव्हाट्यावर आला आहे. एकट्या पाटोदा तालुक्यातील 112 शालांमध्ये वीज कनेक्शन कट करण्यात आले असून यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केली असता शिक्षणाधिकार्यांनी निधी उपलब्ध नसल्यामुळे बील भरता आले नाही, निधी उपलब्ध होताच बील भरून वीज पुरवठा सुरळीत केला जाईल, असे म्हटले आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या आजच्या युगामध्ये भारत महासत्ताक होत असल्याच्या फुशारक्या केंद्र आणि राज्य सरकारकडून मारण्यात येत आहेत. परंतु ऊसतोड कामगाराचा कायम दुष्काळसदृश्य असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये मात्र जिल्हा परिषदेमधील शाळांचा हा भोंगळ कारभार समोर आलेला आहे.