Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeआरोग्य & फिटनेसगेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयाचे खायचे दात दिसले

गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयाचे खायचे दात दिसले


जिल्हा शल्यचिकित्सकांच्या धावत्या भेटीत वैद्यकीय अधिक्षकांसह कर्मचारी गैरहजर
सकाळी पावणे दहापर्यंत रुग्णालयाचे अनेक विभाग कुलूपबंद, दोषींवर कारवाईचे संकेत
गेवराई (रिपोर्टर)- उपजिल्हा रुग्णालयात आज सकाळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी अचानक भेट दिली असता रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षकांसह एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले.

सध्या कोरोनाची भयावह परिस्थिती असताना उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांसह डॉ. कर्मचार्‍यांना याचे भान नसल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले असून कामात कुचराई करणार्‍या वैद्यकीय अधिक्षकांसह कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचे संकेत डॉ. सुरेश साबळे यांनी दिले. येथील रुग्णालयाचे औषध वितरण विभागासह अन्य सर्व विभागांना कुलूप असल्याचे दिसून आल्याने साबळे अधिकच संतापले. कोरोनाच्या महामारीत कामात कुचराई करणार्‍या डॉक्टरांसह कर्मचार्‍यांचे पित आज सकाळी उघडे पडले. सकाळी साडेआठ ते
दुपारी साडेअकरापर्यंत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतात. या वेळी ओपीडी सुरू ठेवावी लागते मात्र गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात आज सकाळी दस्तुरखुद्द जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साबळे यांना एकही कर्मचारी आढळून आला नाही. आज सकाळी साबळे हे सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात गेले. पावणे दहा वाजेपर्यंत ते त्याठिकाणी थांबले मात्र पावणे दहा वाजेपर्यंतही वैद्यकीय अधिक्षकांसह अन्य कोणीही कर्मचारी रुग्णालयात उपस्थित नव्हते. औषध वितरण विभाग बंद होतं. अन्य दोन-तीन विभागांनाही कुलूप लावल्याचे दिसून आले. वैद्यकीय अधिक्षक गैरहजर असल्याने आणि कर्मचार्‍यांचाही पत्ता नसल्याने डॉ. साबळे चांगलेच संतापले. या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याचे संकेत डॉ. साबळे यांनी दिले. संबंधितांना नोटीसा काढणार असल्याचे डॉ. साबळे यांनी म्हटले. आज मितीला रुग्णालयामध्ये डॉक्टरांची उपस्थिती गरजेची आहे मात्र गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षकांसह कर्मचार्‍यांचा बेजबाबदारपणा जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नजरेस पडल्याने गेवराईच्या रुग्णालयाचे खायचे आणि दाखवायचे दात दिसून आले.

Most Popular

error: Content is protected !!