सेवानिवृत्त अधिकार्याचे घर फोडले;
कालिका देवी मंदिराची दानपेटी पळविली
पेटी घेऊन जाताना चोरटा सीसीटीव्हीत कैद
डॉग स्कॉडसह फिंगरपथक घटनास्थळी
बीड (रिपोर्टर): शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरु आहे. दोन-चार दिवसाला कुठे ना कुठे चोरीची घटना घडत आहे. रात्री स्वराज्यनगर येथील एका सेवानिवृत्त अधिकार्याचे घर फोडून घरातील काही ऐवज चोरून नेला तर कालिकानगर येथील कालिका देवीच्या मंदिराची दानपेटी चोरट्याने उचलून नेली. या दानपेटीमध्ये 25 ते 30 हजारापेक्षा जास्त रक्कम असू शकते. पेटी घेऊन जात असताना चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला. या दोन्ही चोरीच्या घटनेचा तपास लावण्यासाठी डॉगस्कॉडसह फिंगरपथक घटनास्थळी दाखल झाले होते.
नारायण देवीदास धांडे (रा. स्वराज्यनगर) हे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. ते आपल्या कुटुंबियासोबत गावी गेले होते. याच संधीचा फायदा अज्ञात चोरट्यांनी उचलून त्यांचे घर फोडून आतील नगदीसह काही दागिने चोरून नेल्याचे सांगण्यात येते. आज सकाळी धांडे घरी आल्यानंतर त्यांना आपल्या घरी चोरी झाल्याचे दिसून आले. दुसरी चारेीची घटना कालिकानगर भागात घडली. येथील कालिकादेवी मंदिराची दानपेटी चोरट्याने एका मोटारसायकलवर
उचलून नेली. या दानपेटीमध्ये पंचवीस ते तीस हजार रुपये असू शकतात, असे सांगण्यात आले. मंदिराच्या बाजुला सीसीटीव्ही असल्याने या कॅमेर्यात चोरटा कैद झाला. या दोन्ही चोरीच्या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. चोरीच्या तपासासाठी डॉगस्कॉड आणि फिंगरपथकाला पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहेत. वाढत्या चोरीच्या घटना पाहता नागरीकांसह व्यापार्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चार दिवसांपूवी गजानन महाराज मंदिरातील दानपेटी चोरून नेली
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहूनगर भागातील गजानन महाराजांच्या मंदिरातील दानपेटी चार दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. त्याच पद्धतीची चोरी रात्री चोरट्याने कालिकादेवी मंदिरात केली असल्याचे दिसून येत आहे.