पावसाचा पत्ता नाही, शेतकर्यांची चिंता वाढली
सोयाबीन, कापसाच्या पिकांनी शेतात मान टाकली
खरीपाचे मूग,
उडीद, मटकी,
तूर, बाजरी,
मका आधीच हातातून गेले
बीड (रिपोर्टर)- मूग, उडीद, मटकी, तूर, बाजरी, मका हे खरीपाचे पीक शेतकर्याच्या हातातून गेल्यानंतर आता ज्या कापसाकडे पांढरं सोनं म्हणून पाहिलं जातं तो कापूस आणि सोयाबीनचे पीकही हातातून जाण्याच्या मार्गावर असून अनेक ठिकाणी या दोन्हीही पिकांनी शेतात मान टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकर्यांची चिंता अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली असून अनेक तलावांची पाणीपातळी तळापर्यंत गेली आहे.
ऑगस्ट महिना संपत आला असला तरी अद्याप बीड जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. शेतकर्यांनी मोठ्या आशेने खरीपाचा पेरा केला. मूग, उडीद, मटका, तूर, बाजरी, मका यासह अन्य पिके केवळ पाऊस नसल्याने हातातून गेले. बीड जिल्हा हा कापूस आणि सोयाबीन उत्पादकांचा जिल्हा आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कापूस, सोयाबीनची लागवड केली जाते. आता हे दोन्ही पिके पाऊस नसल्याने धोक्यात आली आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रात पांढरं सोनं म्हणून ज्या कापसाकडे पाहिलं जातं तो कापूस आणि सोयाबीनचा मोठ्या प्रमाणावर पेरा झालेला आहे, मात्र गेल्या दोन महिन्याच्या कालखंडामध्ये म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. ऑगस्टमध्ये तर पाऊसच नाही, त्यामुळे सोयाबीनला जे फुल आले होते ते गळून पडले आहेत. सोयाबीनच्या पिकांनीही माना टाकायला सुरुवात केली आहे. उभा कापूसही सुकून जात असल्याने बीड जिल्ह्यातला शेतकरी चिंतातूर दिसून येत आहे.
खरीपाच्या पंचनाम्याला आज सुरुवात करा
मूग, उडीद, तूर, बाजरी, मका यासह खरीपांची अन्य पिके शेतकर्यांच्या हातातून गेले आहेत हे उघड सत्य आहे, अशा वेळी विमा कंपनीला सक्त ताकीद देत या पिकांचे पंचनामे आत्तापासून करायला लावा, या आठवड्याभरात पाऊस पडला नाही तर बीड जिल्ह्यातल्या शेतकर्यांच्या शेतातील कापूस आणि सोयाबीनही अक्षरश: जळून खाक होईल. त्या पिकांनी आत्ताच माना टाकायला सुरुवात केली आहे. सद्यस्थिती ही भयावह असून शेतकरी आपल्या शेतातील उभ्या पिकाकडे पाहून चिंतेत आहे.