आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांच्या मुलाखती सुरू
यावर्षी तरी 5 सप्टेंबरला पुरस्कारांचे वितरण होणार का?
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यात 5 सप्टेंबरला शिक्षकांचा सन्मान होण्यासाठी प्रत्येक वर्षी ऐन वेळेस हा कार्यक्रम रद्द करून तो 17 सप्टेंबरला घेण्यात येतो. यावर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणार्या आदर्श पुरस्कारासाठी जवळपास ऐंशी शिक्षकांनी आपले प्रस्ताव दाखल केले असून एका समितीच्या वतीने यांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत.
जिल्हा परिषदेच्या वतीने देशाचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या स्मरणार्थ आदर्श पुरस्कार दिले जातात. 11 शिक्षक आणि एक विशेष शिक्षक असे एकूण 12 शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते. यासाठी या शिक्षकांनी 15 वर्षांच्या कालावधीमध्ये काय काय नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविले याची माहिती या समितीच्या वतीने प्रश्नोत्तराच्या सहाय्याने घेतले जाते. यावर्षी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या शिक्षकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. हा पुरस्कार मिळविण्यासाठी 80 शिक्षकांनी प्रस्ताव दाखल केलेले आहेत. समितीमध्ये प्रकल्प संचालक संगीतादेवी पाटील, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आणि योजना विभागाचे अधिकारी डॉ. सारुक यांचा समावेश आहे. या मुलाखती पार पडल्यानंतर यावर्षी तरी या शिक्षकांचा सन्मान 5 सप्टेंबरला होणार का?असा सवाल शिक्षण प्रेमींतून विचारला जातोय.