गणेश सावंत
जगप्रसिध्द सुरतेच्या लुटीचा विरूध्द अंक गिरवला जातोय का? महाराष्ट्राने एकदा नव्हे दोनदा सुरत लुटली हा इतिहास विरूध्द अंगाने पुन्हा घडवला जाणार का? असे एक ना अनेक प्रश्न राज्यात सुरू असलेल्या आजच्या राजकीय धुमश्चक्रीतून पडत आहे. राज्यातले ठाकरे सरकार पाडण्यासाठी दबा धरून बसलेल्या भाजपाच्या नेत्यांना शिवसेनेत बंड उभारण्यात यश आले आहे. या यशाची पताका ठाकरे सरकारच्या पतनाने फडकावली जाणार का? याकडे नुसत्या महाराष्ट्राचेच नव्हे तर अवघ्या देशाचे लक्ष लागुन आहे. इतिहास साक्षीला आहे सुरतेची लूट महाराष्ट्राला यशस्वी करता आली. मात्र स्वराज्यात सुरतेला महाराष्ट्र कधीच लुटता आला नाही अथवा वरबडता आला नाही. आता मात्र लोकशाहीत महाराष्ट्राचे लचके तोडण्याइरादे दिल्लीतक्त आणि सुरत महाराष्ट्रावर लक्ष ठेवून आहे. यापुर्वीही सुरतच्या मदतीने दिल्ली तक्ताने पहाटेच महाराष्ट्र लुटला. मात्र अवघ्या सहा तासांच्या कालखंडात महाराष्ट्राने पुन्हा दिल्ली तक्तासह सुरतेने लुटलेली लूट हस्तगत केली. आज पुन्हा महाराष्ट्राच्या ठाकरे सरकारवर दिल्लीश्वराच्या इशार्याने सुरत चालून आली आहे. सुरतेच्या आणि दिल्लीश्वराच्या नुमाईंद्यांनी अत्यंत काटेकोरपणे व्यूहरचना आखत शिवसेनेतील काही सरदारांच्या नाराजीशी जमवून घेत तहाच्या भूमिकेत आणि जहागीरीच्या आश्वासनात महाराष्ट्र अस्थिर केला आहे. राज्यातल्या सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या ठाकरेंच्या
शिवसेनेत मोठे बंड
अचानक उभारले गेले. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला आणि राजकीय चाणक्य नीतीला यश आल्यानंतर हा सर्वात मोठा बंडाचा भूकंप शिवसेनेत भाजपाने आणला. हा भूकंप शिवसेनेतच का? तर त्याचा इतिहास पंचेवीस वर्षांच्या घरोब्यानंतर तुटलेला सेना-भाजपाचा संसार आणि हातातोंडाशी आलेली ‘वर्षा’पतीची संधी हुकल्याने देवेंद्र फडणवीस चवताळणे सहाजीक. शिवसेनेला बंड नवे नाही. दस्तुरखुद्द शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हयातीत असताना छगन भुजबळांनी बंड केलं, नारायण राणेंनी बंड केलं, घरातूनच राज ठाकरेंनीही बंडाचं निशान फडकावत स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. आतापर्यंतचे हे सर्वात मोठे बंड मानले जायचे. आज पुन्हा शिवसेनेत एकनाथ शिंदेे नावाच्या कडवट शिवसैनिकाने बंडाचं निशान हाती घेतलं आणि त्या निशानाच्या मार्गावर एक नव्हे दोन नव्हे पाच-पंचेवीस शिवसेनेचे शिलेदार मार्गस्थ होऊन राहिले. शिवसेनेसाठी हा दगा-फटका जेवढा अंतर्गत आहे तेवढाच त्या दगा-फटक्याला रसद ही भाजपाची आणि दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीसांची आहे. सुरतेची लूट ही सातत्याने ही जगाच्या पातळीवर चर्चीली जाते. आता मात्र सुरतेने महाराष्ट्राला लक्ष्य केल्याचे या घटनाक्रमावरून एवढ्यासाठीच लक्षात येते की, एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या समर्थक आमदारांसह सुरतमधल्या एका हॉटेलमध्ये आहेत. राज्यात राजकीय भूकंप आणि सत्ता केंद्रासाठी वर्षापती व्हावे म्हणून ज्यांनी ज्यांनी गुडघ्याला बाशींग बांधले त्यांचा मधुचंद्र सुरतेच्या मदतीने होईल की नाही हे सांगणे कठीण असले तरी सुरतेच्या लुटीत सापडलेल्या सुभेदाराच्या सुनेला महाराष्ट्राने मातेचा दर्जा दिला होता. आता सुरतेच्या हल्ल्यात
वर्षाचे पती बदलणार का?
याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 2019 च्या निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपाचे अंतर्गत मतभेद एवढे वाढले की त्यांना काडीमोड घ्यावा लागला. भाजप हा सर्वात जास्त आमदारांचा पक्ष असताना केवळ शिवसेनेच्या काडीमोडामुळे विरोधी बाकावर बसण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्या स्थितीतही देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना सोबत घेऊन काही तासाचं सरकार बनवलं. मात्र शरद पवारांनी फडणवीसांचे मनसुबे धुळीस मिळवले आणि शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हे सरकार सत्तेत आलं. तेव्हापासून दिल्लीतील सत्ता केंद्राचे बादशहा नरेंद्र मोदी आणि अमित शहा देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून महाराष्ट्र सातत्याने अस्थिर करत आहेत. म्हणूनच गेल्या अडीच वर्षांच्या कालखंडात सर्वात मोठा पक्ष असलेल्या आणि सर्वात जास्त आमदार असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या विरोधी पक्षाने राज्यातील सर्वसामान्य लोकांच्या मुलभूत प्रश्नांपेक्षा सरकार आज पडणार, उद्या पडणार याला अनन्यसाधारण महत्व देत केवळ राजकीय अस्थिरता निर्माण केली. स्वत:चं वर्चस्व स्थापन करायचं असेल तर विरोधकांच्या दुश्मनाच्या काफिल्यात अस्थिरता ही करता आली पाहिजे, आणि ती अस्थिरता निर्माण करण्यात फडणवीसांना अडीच वर्षाच्या कालखंडात प्रचंड यश येत गेले यात दुमत असण्याचे कारण नाही. आजच्या राजकीय भूकंपाने महाराष्ट्रातील
ठाकरे सरकारला धोका
आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी राज्यसभा आणि विधान परिषदेतील आमदारांच्या आकड्यांच्या बेरजेकडे आणि वजाबाकीकडे लक्ष द्यावे लागेल. विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे बहुमत 151 वर घसरले आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 162 आमदार होते. राज्यसभा निवडणुकीपूर्वी ही संख्या 170 होती. म्हणजेच राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची संख्या 10 पेक्षा कमी झाली. विधान परिषदेनंतर एकूण 19 आमदार महाविकास आघाडीपासून दूर गेले. दुसरीकडे, भाजपला आता 134 आमदारांचा पाठिंबा आहे. सरकार टिकण्यासाठी 144 चे बहुमत आवश्यक आहे. महाविकास आघाडी आणि भाजपच्या आकड्यांमधील फरक खूपच कमी आहे, असे म्हटले तर ते चुक नसेल परंतु शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी बंड केले पाहता आणि पक्षांतर बंदी कायदा पाहता विधानसभेमध्ये एकूण 56 आमदार आहेत. कायद्यानुसार शिंदे यांना दोन तृतियांश आमदार म्हणजेच 27 आमदार जमवायचे असतील. सध्या शिंदे यांच्याकडे एकूण पाच-पंचेवीस आमदार असल्याचा दावा केला जातोय. परंतु यात सत्यता किती हे सांगणे कठीण. आज जरी फडणवीसांचं पारडं जड वाटत असलं तरी
सुरतेला महाराष्ट्र लुटणं
हे सहजासहजी जमेल? कारण महाराष्ट्र हा आजही शाहू-फुले -आंबेडकरांच्या विचारावर आहे आणि आजचे दिल्लीश्वरांचे देशातील सत्ताकेंद्र हे विषमता पेरण्याच्या भूमिकेत आहे. अशा स्थितीत प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारावर चालणार्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला सुरतच्या हाती आपला स्वाभिमान देणे परवडणार आहे का? की आपला स्वाभिमान बाळासाहेबांचा शिवसैनिक सुरतेपशी गहाण ठेवील का? असे एक ना अनेक प्रश्न आजच्या राजकीय भूकंपातून समोर येत आहेत. केवळ सत्तेसाठी वैचारिक दृष्टीकोन बंडखोरांनी बाजुला ठेवला असेल तरी पक्षांतर बंदी कायद्यामुळे हे सर्व बंडखोर राजीनामा देऊन पुन्हा सत्ता स्थापनेसाठी अडीच वर्षाच्या कालखंडात समोर येतील का ? तर हे एवढं सोपं नाही. म्हणूनच महाराष्ट्र सुरतेवर सातत्याने भारी राहिला आता लोकशाहीतल्या दिल्लीश्वरांच्या हुकमावरून सुरतेने महाराष्ट्रावर चाल केली असेल तर ही ‘चाल’ कितपत यशस्वी होते हे लवकरच दिसेल. देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत, सुरतेतले बंडखोर आमदार अहमदाबादेत जातील आणि तिथे अमित शहा त्यांची भेट घेतील हा दिवसभरातला घटनाक्रम असेल. परंतु तब्बल साडेतीनशे -पावणेचारशे वर्षाने इतिहास पुन्हा विरुद्ध दिशेने समोर येतो आणि सुरत महाराष्ट्रावर चाल करते हे विचार करण्याजोगेच.