गेवराई (रिपोर्टर): पोलिसांच्या लाठीहल्ल्याने संतापलेला मराठा समाज शांत होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत असून आज गेवराई शहरासह गोदाकाठच्या कई गावांमध्ये सरकारची अंत्ययात्रा काढून सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. तिकडे सराटे अंतरवली येथे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेत राजकारणी केवळ मराठ्यांचा मतदानापुरता वापर करत आहेत, त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका आणि त्यांच्यामुळे तुमचा जीवही जाऊ देऊ नका, असे म्हणाले तर मराठ्यांच्या संतापापुढे राज्यातले शिंदे-फडणवीस-पवार सरकार आज हरकतमध्ये आले असून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देता येते का
यासाठी महत्वपुर्ण बैठक मुंबईत सुरू केली आहे.
सराटे अंतरवलीमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी मराठा आंदोलकांवर पोलिसांनी बेछुट लाठीमार केला, गोळीबार केला, छरर्र्याच्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या. त्यात अनेक आंदोलक, पोलीस जखमी झाले. याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले असून गेवराई तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आजही गेवराई शहरामध्ये सरकारची अंत्ययात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून ही अंत्ययात्रा शास्त्री चौक, दाभाडे गल्ली, तहसील रोड मार्गे स्मशानात पोहचली. या दरम्यान मराठा समाजाने सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. गोळीबाराला आणि लाठीमाराला आदेश देणार्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. अशाच अंत्ययात्रा सिरसदेवी, खाकरआडगाव यासह गोदाकाठच्या अन्य गावांमध्ये आज काढण्यात आल्या.
सरकारची बैठक सुरू
मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात सराटे अंतरवली येथे उपोषण सुरू आहे. या उपोषणावर पोलिसांनी लाठीहल्ला, गोळीबार केला. त्यामुळे राज्यभरात संतप्त मराठ्यांचा भडका उडाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर आता राज्य सरकारने या बाबत हालचाली सुरू केल्या आहेत. आज मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्री आणि समाजातील काही सदस्यांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे. या बैठकीतून आज काहीतरी निर्णय होण्याची शक्यता आहे.