बीड (रिपोर्टर): मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी राज्यभरात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. मांजरसुंबा या ठिकाणी आंदोलन झाले. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी अनेकांची उपस्थिती होती. त्याचबरोबर मांजरसुंबा येथेही धरणे आंदोलन झाले. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे. बीड येथील आंदोलनात महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
उपोषणाला पाठिंबा, मतदानावर बहिष्कार
शिरूर तालुक्यातील राक्षसभुवन तांबा ग्रामपंचायतीने ठराव घेत मराठा समाजाला सरसकट कुणबी मराठा म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे, यासाठी आंदोलन करण्यास बसलेले मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा देत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही निवडणुकांमध्ये मतदान प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचे सांगून राजकीय नेत्यांना गावबंदी केल्याचा ठरावच येथील गावकर्यांनी केचला आहे.
कारी येथे उद्यापासून साखळी उपोषण
सराटी अंतरवलीत आंदोलनास बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी धारूर येथील मराठा समाजाच्या वतीने उद्या दि. 6 सप्टेंबर पासूनमराठा क्रांती मोर्चा साखळी उपोषण धारूर तालुक्यातील कारी येथे करणार आहेत. त्याबाबतचं निवेदन त्यांनी तहसीलदारांना दिलं आहे.