मस्साजोग (रिपोर्टर) – जालना जिल्ह्यातील लाठीमार प्रकरणाच्या निषेधार्थ आणि आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसह तात्काळ कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यात यावे. यासाठी आज दि.06 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9:45 वाजता केज तालुक्यातील मस्साजोग येथे बीड-केज रोडवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये शेकडो मराठा बांधव सहभागी झाले होते. यादरम्यान मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला जाहिर पाठिंबा देण्यात आला.
तर समाजाने ठोस भूमिका मांडत आम्हाला आता केवळ मराठा कुणबी प्रमाणपत्र द्या जे आमच्या हक्काचं आहे. अन्यथा आंदोलन लोकशाही पध्दतीने आणखी आक्रमक करू असा इशारा देखील प्रशासनाला देण्यात आला. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या जिवाला काही झाल्यास महाराष्ट्रात उद्रेक होईल याची सरकारने दखल घ्यावी असा सुचक इशारा देखील यावेळी दिला आहे. यापुढे मात्र बीड जिल्ह्यात होणाऱ्या उद्याच्या चक्का जाम आंदोलनासह इतर आंदोलनासाठी प्रशासनाची तयारी सुरू असुन प्रशासन आणि सरकारची चांगलीच कोंडी होताना पाहायला मिळत आहे. यामुळे सरकार नेमका कधी आणि काय ? निर्णय घेतंय याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
वाहतुकीची कोंडी-
रस्ता रोको प्रसंगी 45 चाळीस मिनिट पोलीस प्रशासनाकडून चोक बंदोबस्त करून वाहतुक ठप्प करण्यात आली होती. मस्साजोग पासुन एक ते दीड किलो मीटर पर्यंत चारचाकी मोठ्या गाड्यांच्या रागांची ट्रफिक जाम होऊन वाहतूकीची कोंडी झाली होती.