बरे झाले देवा कुणबी केलो, नाहीतर दंभेच असतो मेलो -संत तुकाराम
बाप दाखव नाही तर श्राध्द घाल
सरकार, हा खेळ खेळू नका
गणेश सावंत
मो. नं. 9422742810
आरक्षणाच्या मुद्यावरून उभा महाराष्ट्र आग ओकतोय, कोणाची कोणती जात? यावर प्रश्न विचारतोय. जाती-पातीच्या आणि धर्म-पंथाच्या वाती गावागावांत शिलगावल्या जात आहेत. धर्माच्या अफूने जातीची नशा नसानसात कशी भिनेल आणि जाती-जाती एकमेकांसमोर कशा उभ्या राहतील, याकडे प्रकर्षाने आदृश्य हात लक्ष देत आहेत. यातून मराठा, ओबीसी, मुस्लिम, धनगर यांचे आंदोलने उभे राहतायत. या आंदोलनाचे आजपर्यंतचे फलीत काय? तर केवळ त्वेष आणि द्वेष. मग हा त्वेष आणि द्वेष महाराष्ट्रातील मराठा अथवा मराठी जनतेच्या कामी उपयोगी कितपत येतो? याचं उत्तर शुन्य असं देता येईल. आज जो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक समाज असलेल्या मराठ्यांमध्ये असंतोष आहे, तो असंतोष निर्माण करणारे कोण? शाहू महाराजांपासून ते आजपावेत मराठ्यांचं वर्गीकरण करताना क्षत्रीय ते कुणबी असे असताना आज मराठ्यांना कुणबी संबोधणे अथवा अधिकृतरित्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे सरकारला जड का जातय? अवघडल्या सारखं का वाटतंंय? तर याचं उत्तर आरक्षणाचा प्रश्न हा केवळ मताचा गठ्ठा मिळवण्यापुरताच रेंगाळत ठेवायचा आणि रवंथ करायचा, असं येतं. मराठ्यांना कुणबी पुरावे द्या, असे जर कोणी म्हणत असेल तर आम्ही सर्वप्रथम जगद्गुरू संत तुकारामांच्या गाथेचा आधार घेत एक पुरावा देऊ. जगद्गुरू संत तुकोबा म्हणतात,
बरे झाले देवा कुणबी केलो,
नाहीतर दंभेच असतो मेलो ॥
देहू गावात बोलोबाच्या पोटी जन्मलेले जगद्गुरू संत तुकोबा यांचे नाव तुकाराम बोलोबा मोरे अंबिले असे आहे. तुकोबा यांच्या घरी महाजनकी आणि सावकारकी होती. तुकोबा हे जगातले पहिले कर्जमाफीचे जनक आहेत. ते तुकोबा स्वत:ला कुणब्याच्या पोटी जन्माला घातलं म्हणत ईश्वराचे आभार मानतात. मला कुणबी केले नसते तर नाहक दंभाचा आव आणत फुकट या जीवनात मरून गेलो असतो, असे स्वाभिमानाने सांगतात. जिथं महाराष्ट्रात मराठा असलेले जगद्गुरू संत तुकोबा हे स्वत:ला कुणबी म्हणून सांगतात तेव्हा मराठा आणि कुणबी एक असल्याचा दाखला आपल्याला शिवकालीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोळाव्या शतकामध्ये मिळून येतो. आज मराठ्यांना निजामकालीन दस्तऐवज मागण्याचे काम सरकारकडून करण्यात येते तेव्हा सरकारच्या या भूमिकेवर शंका निर्माण करावीशी वाटते. याच सरकारवर नव्हे तर गेल्या पन्नास वर्षांच्या कालखंडात जे काही सरकार आले, त्या सरकारने मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न जातीने शिलगत ठेवण्याचा प्रयत्न कायम ठेवला.
मराठा म्हणजे कोण?
शेतकरी, कष्टकरी, रक्षक असे दाखले आपल्याला आजपर्यंत पहावयसा मिळतात. जेव्हा मराठा समाजातले घरे लष्कर सेवेत काम करायचे तेव्हा त्यांना क्षत्रिय असे संबोधले जायचे. मराठा समाजातले घरे शेती करायचे तेव्हा त्यांना कुणबी म्हणून ओळखले जायचे. डॉ. पंजाबराव देशमुखांचे या बाबतचे विचार आपण पाहितले तर ते सातत्याने म्हणायचे, ‘मराठा समाज हा लष्करी सेवेत होता, त्याचा उदय श्रमिक कुणबी वर्गातून झाला. सैन्यात नसलेले मराठे शेती करत किंवा सैन्यात भरती होणारा समाज कृषक समाजातून येत असे.’, याचाच अर्थ असा की, मराठे हे आधी शेतकरी होते आणि नंतर ते क्षत्रीय होते. व्यवसायाच्या आधारावर त्यांचं मराठा क्षत्रीय कुणबी असं वर्गीकरण करण्यात आलं. बहुजन वर्गाचं हित हे पंजाबरावांचं ब्रिद होतं. ते आपल्या भाषणातून नेहमी एक घोषणा द्यायचे, ‘तलवार विसरा, जातीभेद पुरा, सेवाभाव धरा’ देशाच्या राष्ट्रगीतात मराठा हा शब्द येतो. भारतीय लष्करात मराठा बटालियन आहे. महाराष्ट्रात राहतो तो मराठा, मराठी बोलणारा तो मराठा. याचाच अर्थ मराठा ही जात नाही हे सिद्ध होते. आपण सारे कुणबी. भारत हा देश कृषीप्रधान असून शेती व शेतकरी हे आपल्या देशाचं प्राणभूत तत्व आहे, असं पंजाबरावांचं मत असायचं. यावरून त्यांनी भविष्याकडे दृष्टी ठेवून मराठ्यांनी आपल्या प्रमाणपत्रावर कुणबी असल्याचे नोंद करण्याचे आवाहन केले होते. इ.स. 1881 च्या जनगणनेनुसार मराठा व कुणबी या भिन्न जाती नसून एक आहेत. तसेच बॉम्बे गॅझेटप्रमाणे मराठा व कुणबीयांमध्ये भेदाभेद नसल्याचे त्यांनीच स्पष्ट केले आहे. पंजाबराव हे भारताच्या राज्य घटना समितीचे सदस्य होते. त्यावेळी त्यांनी आरक्षण हा निकष जाती-पातीपेक्षा आर्थिक दुर्बलतेवर असावा, असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. मराठा हे कुणबी आहेत, याचे हे सर्व पुरावे असताना आज मराठ्यांना कुणबी असल्याचा डांगोरा तोही कागदी पिटवण्यास भाग का पाडलं जातय?
कुणबी म्हणजे नेमके काय?
कुणबी म्हणजे शेती करणारा वर्ग किंवा जात असा सरळसाधा अर्थ आहे. महाराष्ट्रातील शेती करणार्या समुदायाला कुणबी संबोधले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांचा ब्रिटीश कागदपत्रांमध्ये कुणबी असा उल्लेख केला गेला आहे. ते वेरुळ गावचे पाटील होते. पाटील, देशमुख, महाजन या उपाध्या अथवा पदव्या असायच्या. परंतु हे सर्व शेतकरी आणि शेती करणारे असायचे. कुणबी हा शब्द कुळ आणि बीज या दोन शब्दांपासून बनलेला आहे. कुळ म्हणजे वंश, बीज म्हणजे बी. कुणबी सुरुवातीस दक्षीण भारतात म्हणजेच महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक वगैरे ठिकाणी राहायचे. परंतु मराठा सम्राज्याचा विस्तार जसा जसा वाढत गेला तसे तसे ते संपुर्ण भारतात विखुरल्या गेले. नव्हे नव्हे तर पानीपतच्या लढाईनंतर आजही अनेक मराठे हे नेपाळमध्ये आहेत. मराठा आणि कुणबी हे काही वेगळे नाहीत. उदाहरण घ्यायचच गेलं, ग्वालियरचे सिंधिया कुणबी आहेत. कै. माधवराव सिंधियांनी महाराष्ट्रातल्या एका जाहीर सभेमध्ये आपण ओबीसी असल्याचे मान्य केले होते. 27 डिसेंबर 1917 रोजी बुलढाणा जिल्ह्यात आयोजीत समाजप्रबोधन शिबिरात छत्रपती शाहू महाराज म्हणाले होते, कुणबी आणि मराठा यांच्यात मुळीच फरक करता येणार नाही ते एकच आहेत. नागपूरचे राजे श्रीमंत रघुजी भोसले यांचे सुद्धा हेच मत होते. जांभ, छिंदवाडा येथे घेतलेल्या क्ष लो कुणबी समाजाच्या परिषदेत त्यांनी तसे मत व्यक्त केले होते. न्यायमूर्ती पी.एस. कोतवाल यांनी इ.स. 1976 साली कुणबीव मराठा ही जात एकच आहे, असा निकाल दिला होता. एवढे सारे धडधाकट, स्पष्ट पुरावे असताना शासन मराठा कुणबी यांच्यात भेद का करतय? हा प्रश्न उभ्या महाराष्ट्राने सरकारजातीला विचारायलाच हवा. मग तो प्रश्न केवळ मराठ्यांनी नव्हे तर ओबीसी, धनगर यांच्यासह सर्वच जातीच्या
लोकांनी विचारावा.
प्रश्न आरक्षणाचा
म्हणून मराठ्यांनी मराठ्यांसाठी लढा द्यावा, मुसलमानांनी मुसलमानांसाठी द्यावा, ओबीसींनी ओबीसींसाठी द्यावा. हे जे जातीचे आणि धार्मचे वर्गीकरण आणि ध्रुवीकरण केवळ सत्ताकारणासाठी होत असेल तर छत्रपती शिवरायांचा ‘सर्वास पोटास लावणे आहे’ हा मुलमंत्र नक्कीच पायदळी तुडवला जातोय, असे आमचे स्पष्ट मत आहे. आज मराठ्यांना आरक्षण द्यावं, महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी होत असल्याने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यातले ओबीसी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत विरोध करत आहेत, मराठे कुणबी प्रमाणपत्रासाठी जीव द्यायला तयार आहेत, ही स्थिती निर्माण करण्यामागं सरकार आणि राजकारणी आहेत. हे स्पष्ट सांगायला कुण्या जानकाराची गरज नाही. मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. त्यामुळे
सरकार, बाप दाखव
नाही तर श्राद्ध घाल
हा खेळ खेळू नका. मराठा हे कुणबी आहेत, हे उघड उघड त्रिवार सत्य आहे. प्रश्न हा येतो, की या मराठ्यांना अथवा कुणबियांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं, साहजिकच ओबीसीमधून आरक्षण द्यायला ओबीसी समाजाचा विरोध असणे कारण स्वत:च्या ताटातली अर्धी भाकर इतरांना वाटणे हे सोयीस्कर नसतं, तिथं पुर्ण भाकरीची गरज असते. मात्र तीच पुर्ण भाकरी देण्याचे काम सरकार करत नाही. एकूणच मराठा समाजाची आजची स्थिती पाहता केंद्र सरकारने एक अधिकृत कायदा करून मराठ्यांना आरक्षणात सामावून घेणे चुकीचे ठरणार नाही. शाहू महाराज राजे होते, त्यांनी आरक्षण जाहीर केले तेव्हा उच्चवर्णीयांकडून त्यांना विरोध झाला, ते मागे हटले नाहीत, आताही स्वत:ला राजे म्हणणारे, विश्वगुरू संबोधणारे राजेशाही थाटात वावरत आहेत, त्यांनीच खरा तर हा निर्णय घ्यायला हवा.