मुख्यमंत्री शिंदे कोंडी फोडण्यात यशस्वी मात्र साखळी उपोषण सुरुच राहणार
सरकारला एक महिन्याचं अल्टिमेट, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगेंनी ज्यूस घेतले
भागवत जाधव । सराटे अंतरवली
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या 16 दिवसांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची कोंडी अखेर फुटली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी फळांचा रस प्राशन करत मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सातत्याने चर्चा सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी सरकारला काही दिवसांचा अवधी देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, राजेश टोपे, संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर हे सर्वजण अंतरवाली सराटी येथे दाखल झाले. याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी फळांचा रस पिऊन आपल्या उपोषणाची सांगता केली.
यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, आज राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या उपोषणस्थळी आले आहेत. मराठा समाजाला एकनाथ शिंदेंच न्याय देऊ शकतात, ही माझी भावना आहे. ते आज इथे आलेत म्हणून मी ही गोष्ट म्हणत नाही. पण ते आरक्षण देतील, हा माझा विश्वास आहे. शासनाची मागणी होती की, आम्हाला एक महिन्यांचा वेळ द्या. आपण त्या पद्धतीने एक महिन्यांचा वेळ दिला आहे. 31 व्या दिवशी सरकार आपल्या मराठ्यांना कुणबी दाखले देईल, असा विश्वास आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.
जरांगे पाटील यांच्या वडिलांनाही मुख्यमंत्र्यांनी पाजला ज्यूस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपोषणस्थळी आल्यावर जरांगे पाटील यांचे वडिलही मंचावर आले. मुख्यमंत्र्यांनी त्यांची ख्यालीखुशाली विचारली. मनोज जरांगे पाटील यांना ज्यूस दिल्यावर मुख्यमंत्र्यानी जरांगे पाटलांच्या वडिलांनाही ज्यूस दिला.
समाजबांधवांनो टोकाचं पाऊल उचलू नका; जरांगे-पाटलांचं आवाहन
मराठा आरक्षणाची लढाई यशस्वी केल्याशिवाय मी माघार घेणार नाही. माझा बाप अजूनही कष्ट करतो, मी त्याच्या कष्टाची जाणीव ठेऊन मराठा समाजाशी कधीच गद्दारी करणार नाही. भ्रष्टाचाराचे आरोप मी कधीच सहन करणार नाही, असं सांगताना मराठा समाजबांधवांनी कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.
मी खानदानी मराठा, ती माझी औलाद नाही,
माझं ते रक्त नाही; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांसमोरच भडकले
जालना : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी मला एक चिठ्ठी दिली. ती चिठ्ठी नेमकी कशाची होती? त्या प्रश्नांनी मला लोकांनी बेजार केलं. काही जणांनी माझ्यावर आरोप करायला सुरुवात केली. पण मी खानदानी मराठा आहे. कुणाच्या सांगण्यावरून उपोषण करत नाही आणि मागेही घेत नाही. लोकांना विचारूनच मी सरकारला एक महिन्याचा अवधी दिला. त्याला तमाम लोक साक्षीदार आहेत. गद्दारी करणं आमच्या रक्तात नाही, माझ्यावर आरोप करणार्या संघटनेने हे लक्षात घ्या, असं प्रत्युत्तर देताना
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांसमोरच भडकले.
मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावीत, यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 17 दिवसांपासून उपोषण सुरू होतं. या उपोषणाची कोंडी फोडण्यासाठी सरकारच्या वतीने प्रयत्न सुरू होते. जालन्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री अर्जुन खोतकर सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्याशी सातत्याने बोलत होते. दरम्यान, सरकारकडून आश्वस्त करणारी चिठ्ठी रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या हाती ठेवली. त्यावेळी ही चिठ्ठी नेमकी कशाची आहे? असे प्रश्न विचारून लोकांनी जरांगे पाटलांना भांडावून सोडलं. त्यावरूनच मनोज जरांगे आज मुख्यमंत्र्यांसमोरच भडकले.