महिलांसह मुला-मुलींची लक्षणीय संख्या
‘एकच मिशन, मराठा आरक्षण’च्या घोषणा
पाटोदा (रिपोर्टर): – एक मराठा मराठा, एकच मिशन मराठा आरक्षण अशा घोषणा देत सोनेगाव सौंदाना येथील गावकर्यांनी सोनेगाव ते पाटोदा बैलगाडी मोर्चा काढत मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली. सदरचा मोर्चा हा तहसील कार्यालयावर आल्यानंतर या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. या वेळी मुख्यमंत्री साहेब, तुम्ही बोलून मोकळं व्हायचं म्हरता, आम्ही निवडणुकीच्या काळात तुम्हाला घरी बसवून मोकळे करू, असा इशारा उपस्थित मोर्चेकर्यांनी दिला. या मोर्चामध्ये महिलांसह बालकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी 17 दिवस सराटे अंतरवली येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले. सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला आहे, तो वेळ देत उपोषण मागे घेण्यात आले असले तरी शांततेच्या मार्गाने साखळी उपोषण, निदर्शने आणि मोर्चे आजही राज्यभरात चालू आहेत. आज पाटोदा तालुक्यातील सोनेगाव सौंदाना येथील मराठा समाजाने पाटोदा तहसीलवर बैलगाडी मोर्चा काढला. गावातून अनेक जण बैलगाडी, ट्रॅक्टरने पाटोदा शहरात डेरेदाखल झाले. ‘एक मराठा लाख मराठा’, ‘एकच मिशन, मराठा आरक्षण’च्या घोषणा या वेळी देण्यात येत होत्या. सदरचा मोर्चा हा पाटोदा तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चाचे रुपांतर नंतर सभेत झाले. या वेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत मराठा समाजाला आरक्षणाची किती नितांत गरज आहे हे सांगितले. त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेब, तुम्ही बोलून मोकळे झालात आणि मराठा समाजाला आरक्षर दिं नाही तर 2024च्या निवडणुकी-=मध्ये तुम्हाला घरी बसवून आम्ही मोकळे करू, असा सज्जड इशारा मोर्चेकर्यांनी दिला. हजारोंच्या संख्येने असलेल्या मोर्चामध्ये अबालवृद्ध मोठ्या संख्येने दिसून येत होते.