16 लाखपेक्षा जास्त किंमतीचे तब्बल 671 झाडे जप्त, तीन शेतकरी अटक, एक फरार
नेकनूर (रिपोर्टर)- नापिकीने आणि सातत्याने पडत असलेल्या दुष्काळाने पिचलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकरी कायदा हातात घेत धक्कादायक तंत्राचा वापर करत असल्याचे उघड होत असून नेकनूरपासून काही अंतरावर असलेल्या करचुंडी गावच्या शेतात तब्बल 671 गांज्याची झाडे आढळून आली. नेकनूर पोलिसांसह आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या पथकाने तब्बल 10 तास शेतात गांज्याची झाडे उपटून जप्त केली. या झाडांची बाजारात किंमत 16 लाख 54 हजार 600 रुपये एवढी असून या प्रकरणात तीन शेतकर्यांना ताब्यात घेण्यात आले आहे तर एक शेतकरी फरार असल्याचे सांगण्यात येते.
याबाबत अधिक माहिती अशी की, नेकनूरपासून काही अंतरावर असलेल्या करचुंडी येथील काही शेतकर्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणावर गांज्याच्या झाडांची लागवड केल्याची माहिती नेकनूर पोलिसांना झाली. या घटनेची माहिती तात्काळ जिल्हा पोलीस अधिक्षक आणि आयपीएस अधिकारी पंकजकुमावत यांना देण्यात आल्यानंतर नेकनूर पोलीस व कुमावत यांच्या पथकाने संयुक्तपणे करचुंडी गावच्या संबंधित शेतात दुपारी एक वाजता छापा मारला. तेव्हा येथील शेतकरी बाळासाहेब देवराव शिंदे यांच्या शेतात एकूण 332 गांज्याची झाडे मिळून आली तर बंकट कल्याण शिंदे यांच्या शेतामध्ये सात, दिगांबर आश्रुबा शिंदे यांच्या शेतात 211, कुंडलिक निवृत्ती आमटे यांच्या शेतात 121 गांज्याची झाडे आढळून आली. सदरची झाडे उपटण्यासाठी पोलिसांना तब्बल आठ ते दहा तास लागले. दुपारी एक वाजता ही कारवाई सुरू झाली होती. ती रात्री दहा वाजेपर्यंत चालली. या झाडांची किंमत 16 लाख 54 हजार 600 रुपये एवढी असून पोलिसांनी ही कारवाई करण्यासाठी मोठी कुमक करचुंडीच्या शेतात मागवली होती. सातत्याने दुष्काळी स्थिती आणि नापिकी याला सामोरे जाताना काही शेतकरी कायदा हातात घेत गांज्याच्या झाडांची लागवड करताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच मोठी कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी शेतकरी बाळासाहेब शिंदे, बंकट शिंदे, दिगांबर शिंदे यांना अटक करण्यात आली असून कुंडलिक आमटे हा शेतकरी फरार असल्याचे सांगण्यात येते. सदरची कारवाई ही सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे, पोलीस उपनिरीक्षक अजय पानपाटील, पो.उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे, पोलीस कर्मचारी प्रशांत क्षीरसागर, बाळासाहेब ढाकणे, विशाल क्षिरसागर, गिते, शेख शमीम पाशा, दत्ता बळवंत, संतोष राऊत, बाळासाहेब डोंगरे, गोविंद राख, मुकुंद ढाकणे, पुंडगे, शेळके, होमगार्ड मुन्तजीर आत्तार, खंदारे, उबाळे यांनी केली. या प्रकरणी पो.उपनिरीक्षक अजय पानपाटील यांच्या फिर्यादीवरून या चारही शेतकर्यांविरोधात गु.र.नं. 291/2023 कलम 20 एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.