मलिकांना तुरुंगातून बाहेर काढण्यात
अजित दादांचा मोठा हात, सूत्रांचा दावा
मुंबई (रिपोर्टर)-मनी लाँड्रिंगप्रकरणी नुकतेच तुरुंगातून बाहेर आलेले नवाब मलिक लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासोबत जाणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. गत काही दिवसांपासून अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचा 42 वा आमदार जाणार असल्याची चर्चा रंगली होती. आता ते नवाब मलिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. मलिकांना तुरुंगातून बाहेर काढण्यामागे अजित पवार असल्याची चर्चाही या प्रकरणी राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राष्ट्रवादीचा कारभारी कोण? या मुद्यावर सध्या निवडणूक आयोगापुढे सुनावणी सुरू आहे. शुक्रवारीपासून सुरू झालेल्या या सुनावणीत अजित पवार गटाने आपल्याला 53 पैकी 42 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. यामुळे 42 वा आमदार कोण? अशी खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पण आता हा 42 वा आमदार नवाब मलिक असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.नवाब मलिक यांना आपल्या गटात घेण्यासाठी राष्ट्रवादीचे शरद व अजित पवार हे दोन्ही गट प्रयत्नशील होते. दोन्ही गटाच्या नेत्यांनी मलिक यांची भेट घेऊन त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मलिक यांनी काही दिवसांनी निर्णय जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार त्यांनी आपला कौल अजित पवारांना दिल्याची माहिती आहे.